
दैनिक चालु वार्ता वाघोली प्रतिनिधी- आलोक आगे
हवेली तालुक्यातील आव्हाळवाडी गावात एका तरुणाने लावलेल्या फलकांची सध्या गावात आणि परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. “पॅनल प्रमुखांच्या भरोशावर निवडणूक लढवू नका, पैशाची खराबी होते” अशा आशयाचा फलक लावून मतदार जनतेला सावध करण्याचा प्रयत्न केला आहे.
या फलकात तरुणाने थेट मतदार राजाला उद्देशून सल्ला दिला आहे की, निवडणूक ही विश्वासार्हतेवर आधारित असावी. स्वतःच्या अनुभवातून बोलताना त्याने म्हटले आहे की, काही पॅनल प्रमुख स्वतःच्या फायद्यासाठी तडजोड करतात आणि दुसऱ्याचे पैसे वाया घालवतात हे या फलकातून सुचवले आहे. ‘येणाऱ्या काळात बदल घडावा बास झाले’ त्याच त्याच घरातले उमेदवार असा मजकूराचा फलक झळकत आहे. नागरिकांनी योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहनच या फलकांतून केले असल्याचे दिसून येते.
गावात हे फलक लक्षवेधी ठरत असून, स्थानिक विजय आव्हाळे यांनीही या कृतीचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, “विश्वासार्हता’ ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे. ती लयाला गेली असल्याने, असे फलक लागणे चुकीचे नाही.
सध्या हा फलक सोशल मीडियावरही व्हायरल होत असून, लोकशाहीत सामान्य तरुणाने उठवलेला आवाज ही सकारात्मक बाब मानली जात आहे.