
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा /-सुरेश ज्ञा. दवणे
जालना
दिंडीत कोणीच कोणाला नावाने हाक मारत नाही. ‘माऊली, माऊली’ हाच एकमेव संवाद असतो. इथे नाव, पद, जात-पात, भाषा, प्रांत काहीच लागत नाही. सगळे समान, सगळे भक्त. ‘माऊली’ म्हणणं ही आपल्या भक्तीची खरी अभिव्यक्ती आहे, अशा शब्दात शिवसेनेचे जालना शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांनी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ असलेल्या दिंडीतील आपले अनुभव व्यक्त करून प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पायी दिंडी अनुभवून आपले जीवन कृतार्थ बनवावे, असे म्हटले आहे.
पंढरपूर आषाढी दिंडीत गेल्या 18 वर्षांपासून अखंडपणे सहभागी होत असलेल्या विष्णू पाचफुले यांनी म्हटले आहे की, सध्या दिंडी फलटण ते बरड 21 किलोमीटर अंतरावर आहे. जालन्यातून आपल्यासोबत सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे किशोर शिंदे, पांडुरंग खैरे, शंकर घारे, राम खांडेभराड, अविष राठोड यांचाही उत्स्फूर्त सहभाग आहे. वारीतील विशेषतेकडे लक्ष वेधताना पाचफुले यांनी सांगितले की, विठ्ठल भेटीच्या ओढीने चालताना कितीही अंतर पार केलं तरी थकवा जाणवत नाही. पावसाचा मारा होतो, ऊन झेलावं लागतं; पण मन थकत नाही. एक प्रकारची आतून ऊर्जा तयार होते, ती म्हणजे विठुरायाला भेटण्याची आस. दिंडीत धर्म, भाषा, प्रांत काही अडथळा ठरत नाही. वारी म्हणजे अहंकार विसरण्याची जागा आहे. इथे पद नाही, प्रतिष्ठा नाही. फक्त भक्ती असते. कोणीच कोणाला नावाने हाक मारत नाही. सगळे एकमेकांना ‘माऊली’ म्हणतात. तीच खरी विठ्ठल भक्तीची ओळख आहे, असे विष्णू पाचफुले म्हणाले.
पाय साथ देतील, तोपर्यंत वारी करणारच…
दिंडी ही केवळ परंपरा नाही, ती जीवन जगण्याची सजीव शाळा आहे. इथे कोणालाही कुणाची ओळख लागत नाही, नाव लागत नाही; सगळेच एकमेकांना ‘माऊली’ म्हणतात आणि एकमेकांच्या सेवा करतात. कुणी थकलं तर हात देतात, कुणी पडल्यावर औषध लावतात, कुणी उपाशी राहू नये म्हणून अन्न वाटतात.हे पाहून मन भारावून जातं… आणि विठोबा भेटणार, या आशेने थकवा कुठेच जाणवत नाही. जोपर्यंत पाय साथ देतील, तोपर्यंत मी वारी करणारच. विठ्ठल भक्ती हीच माझी खरी शक्ती आहे आणि वारी हे माझं अध्यात्मिक बळ आहे, असे विष्णू पाचफुले म्हणाले.