
मनसे-उद्धव ठाकरे सेनेच्या ‘या’ दोन बड्या नेत्यांची भेट; बंद दराआड नेमकी काय झाली चर्चा ?
आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वच पक्ष निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसापासून राज व उद्धव ठाकरे बंधू ऐकत येणार असल्याच्या चर्चा रंगल्या असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
हिंदी सक्तीच्या विरोधात 5 जुलैला काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी राज व उद्धव ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. त्यातच आता मनसे-उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांची भेट झाली असून त्यामध्ये युतीबाबत बंद दराआड चर्चा झाली आहे.
हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मनसे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचा 5 जुलै रोजी एकत्र मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत दोन्ही सेना कामाला लागल्या असून नेतेमंडळीनी जबाबदारी वाटून घेतली आहे. त्यामुळे हा मोर्चा मोठ्या संख्यने निघणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकारणापेक्षा आपल्या अस्मितेच आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे. याचा सर्वाधिक विचार केला पाहिजे. उद्याच्या मोर्चाचे विजयात रूपांतर करू असा विश्वास, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला.
त्यातच आता येत्या काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच युतीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. मनसे (Mns) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युतीची बंद दाराआड चर्चा सुरु झाली आहे. याबाबत दोन्ही पक्षांकडून सूचक विधानेही करण्यात आली आहेत. त्यातच या दोन्ही पक्षांच्या दोन प्रमुख नेत्यांनी भेट घेतल्याचे समजते.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांची भेट झाली आहे. या भेटीबाबत बाळा नांदगावकर यांनी दुजोरा दिला आहे. याबाबत बोलताना नांदगावकर यांनी, भेटीगाठी होतच असतात. मित्र म्हणून भेटतात. चर्चेसाठी भेटतात. वेगवेगळे विषय असतातच असे सूचक विधान केले आहे. त्यामुळे या दोघांमध्ये यावेळी मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युतीबाबत प्राथमिक चर्चा झाली असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता या दोन पक्षाच्या युतीबाबत उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हिंदी विरोधातील मोर्चासाठी सर्व पक्षांना आमंत्रण देण्यात येत आहे. याबाबत बोलताना नांदगावकर म्हणाले, ‘आम्ही सगळ्यांना आमंत्रण देत आहोत. हिंदी भाषिकांना देखील आम्ही आमंत्रण दिलेले आहे. कारण याच महाराष्ट्राने आणि मराठीने त्यांना भरपूर काही दिले आहे. आता या भाषेचा सन्मान करण्याची वेळ आली असल्याचे यावेळी बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.