दैनिक चालू वार्ता उपसंपादक धाराशिव- नवनाथ यादव
धाराशिव/भूम:- तालुक्यातील आरसोली गावाकडे जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत आहे. बार्शीकडे जाण्यासाठी महत्त्वाचा असलेला हा मार्ग सध्या खड्ड्यांनी भरलेला असून, नागरिकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्त्याची अवस्था आणखी बिकट होते.
याच पार्श्वभूमीवर, आरसोली येथील नितीन श्रीधर गुंजाळ या तरुणाच्या पुढाकाराने गावातील युवकांनी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी तहसील कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन आंदोलन छेडले. आंदोलनावेळी उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी व कार्यकारी अभियंता यांनी उपस्थित राहून रस्ता तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
पूर्वी
आता
प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार, मागील आठवड्यात रस्त्याच्या डागडुजीचे काम करण्यात आले. मात्र हे काम तात्पुरत्या स्वरूपाचे असून पावसाळ्याच्या काळात ते तग धरू शकेल, याबाबत ग्रामस्थांमध्ये शंका व्यक्त केली जात आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे नितीन गुंजाळ यांनी सांगितले की, “डागडुजी ही फक्त तात्पुरता उपाय आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार पुढील ३–४ महिन्यांत भूम ते आरसोली रस्ता नव्याने, चांगल्या दर्जाने तयार करावा, हीच आमची ठाम मागणी आहे.”
आरसोली हे गाव अधिकाऱ्यांचे गाव म्हणून परिचित असून राजकीयदृष्ट्याही गावाला विशेष महत्त्व आहे. तरीदेखील अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांकडून रस्त्याच्या कामांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळेच युवकांनी पुढाकार घेऊन आंदोलन उभारले.
यासंदर्भात माजी सरपंच प्रशांत मुंडेकर म्हणाले, “चांगला रस्ता हे गावाचं वैभव आहे. रस्ता असेल तर शिक्षण, आरोग्य, शेती आणि व्यापार – सगळ्या गोष्टींना चालना मिळते. प्रशासनाने लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करावा.”
गावकऱ्यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर रस्ता पक्का करून न मिळाल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
🗣️ “रस्ता हा गावाचा प्राणवायू आहे. तोच नसेल, तर विकास कसा होणार?” :- आरसोली ग्रामस्थ