
सोलापुरात पोलीस आयुक्तांनी मारली भाजप पदाधिकाऱ्याला लाथ !
पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष जिशान मोहम्मद सलीम सय्यद यांना लाथ मारल्याचा प्रकार घडला आहे.
पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांची भेट घेऊन केली आहे.
भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी शुक्रवारी याबाबतचे निवेदन दिले आहे. यात किडवाई चौक येथे गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास जिशान सय्यद थांबलेले असताना त्यांना अर्वाच्य भाषा वापरून शिवीगाळ करून लाथ मारली. वाहतुकीचे नियम मोडलेले असतील तर वाहतूक नियमाप्रमाणे पोलिसांनी कारवाई करावी. कायद्याच्या चौकटीच्या अधीन राहून कारवाई केल्यास हरकत नव्हती. पण, मुद्दामहून टार्गेट केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मी पार्किंगच्या झोनमध्ये थांबलेलो होतो. तेव्हा एसीसी खिरडकर यांनी मला शिवीगाळ करत लाथ मारली. याबाबत पोलिस आयुक्तांना निवेदन दिले. त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आम्हाला आश्वासन दिले आहे, अशी माहिती तक्रारदार जिशान सय्यद यांनी दिली. तर त्या घटनेबाबतचे निवेदन शुक्रवारी मला दिले. त्यावर चर्चा झाली. त्यावेळी झालेले गैरसमज दूर झाले आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली.
भाजपा कार्यकर्ता जिशान सय्यद यांना लाथ मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एसीपी सुधीर खिरडकर हे रस्त्यातून जात असताना जिशान हे चौकातच दुचाकीवर बसलेले होते. त्यावेळी एसीपी त्यांना काहीतरी बोलत असतात. पण तरी जिशान तसेच बाईकवर बसून होते. त्यांची गाडीवरील बसलेली पोझिशन पाहून रागाने येऊन त्यांना लाथ मारल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
व्हायरल झालेला व्हिडीओ एकूण २८ सेकंदांचा आहे. किडवाई चौकात वाहतूक पोलिस हे वाहतुकीचे नियंत्रण करत होते. त्यावेळी त्यांच्या समोरून एसीपी खिरडकर यांची गाडी येते. त्यानंतर ते गाडी रस्त्यातच थांबवून जिशान यांच्याकडे गेले. त्यानंतर हा प्रकार घडला. यावेळी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, ही घटना जेथे घडली तेथून जवळपास शंभर मीटर अंतरावरील कॅमेऱ्यात हा व्हिडीओ रेकॉर्ड झाला आहे. भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महिला आघाडी शहराध्यक्ष विजया वड्डेपल्ली, अल्पसंख्याक शहराध्यक्ष जाकीर सगरी व भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महामंत्री जिशान सय्यद यांनी एसीपी सुधीर खिरडकर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांना दिलं आहे.