
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी : अनिल पाटणकर
पुणे : महिला बाल विकास विभागाच्या “नीव” प्रकल्पा अंतर्गत पुण्यातील सरकारी अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी योगदान दिलेल्या कर्तुत्ववान आंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविका यांचा सन्मान सोहळा महिला बाल विकास विभाग, बजाज फिन्सर्व्ह आणि युनायटेड वे ऑफ दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच पुण्यामध्ये पार पडला. यावेळी प्रभावी अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांशी संवाद आणि समाजाभिमुख उपक्रमांमुळे विशेषत्वाने उल्लेखनीय काम करणाऱ्या जवळपास ५० आंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना महिला बाल कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकारी मनीषा बिलारीस यांनी सांगितले कि, “शिक्षक हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचा कणा आहेत. आजचा हा गौरव समारंभ त्यांच्या अविरत समर्पणाला एक सन्मान आहे, विशेषतः कठीण परिस्थितीतही प्रत्येक विद्यार्थ्याचे शिक्षण आणि विकास सुरू राहावा यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीला एक सलाम आहे .” तर युनायटेड वे ऑफ दिल्लीचे डॉ. सुजीत रंजन यांनी सांगितले कि, “शिक्षक हे राष्ट्रनिर्मितीचे खरे शिल्पकार आहेत, जे पुढील पिढ्यांचे घडवणारे असतात. त्यांच्या समर्पणाची दखल घेणे हे शिक्षण व नवोपक्रमाच्या संस्कृतीसाठी अत्यावश्यक आहे. ‘नीव प्रकल्पा’तून आम्ही नेहमीच मूलभूत शिक्षणाला प्राधान्य दिले आहे, आणि अशा उपक्रमांमुळे शिक्षण क्षेत्रातील घटक आणि आमचे भागीदार बजाज फायनसर्व यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होते.”
या वेळी महिला बाल कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकारी दिलीप हिवराळे, श्रीमती भालेराव, श्रीमती मनीषा बिलारीस नोडल अधिकारी, महिला बाल कल्याण विभाग, बजाज फिन्सर्व्हच्या श्रीमती लिना राजन, श्रीमती योजना पळसे आणि युनायटेड वे ऑफ दिल्लीचे डॉ. सुजीत रंजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.