
दैनिक चालु वार्ता पाटोदा (प्रतिनिधी): सुनिल तांदळे
पाटोदा (बीड): पाटोदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यालयात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी नागरिक कामानिमित्त कार्यालय गेले मात्र अधिकाऱ्याच्या ऑफिसला कुलूप. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सरकारी कार्यालय बंद असणे म्हणजे प्रशासनाच्या बेशिस्त कारभाराचे जिवंत उदाहरण आहे. याला जवाबदार कोण? या विभागाचे प्रमुख अधिकारी हे आपल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे सोडून बेपर्वा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. कार्यालय वेळेत उघडण्याऐवजी, संपूर्ण बंद ठेवणे ही केवळ शिस्तभंग नव्हे, तर नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणणारी कृती आहे. “सरकारी कामांमध्ये आधीच प्रचंड विलंब होतो, त्यात हे असं ऑफिसलाच कुलूप? मग आम्ही गाठायचं कोणाला?” असे प्रश्न संतप्त नागरिक विचारत होते. काहींनी तर थेट व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करत अधिकाऱ्यांच्या निष्काळजी कारभाराचा पर्दाफाश केला.
आता अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित निलंबनाची मागणी नागरिकांकडून होत आहे. पाटोदा सारख्या ग्रामीण भागात नागरिकांना वेळेवर काम न झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम होतात, हे प्रशासनाने लक्षात घेतले पाहिजे.
” अधिकारी ‘दाखवा आणि बक्षीस मिळवा”
प्रशासनावर जनतेचा दबाव अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवर बक्षीस जाहीर करण्याची योजना प्रशासनाने राबवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अशा हलगर्जीपणा करणार्या अधिकाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी कठोर पावले उचलली जाणे गरजेचे आहे.
जर अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसतील, कार्यालय कुलूपबंद ठेवले जात असेल, तर सामान्य जनतेचा सरकारवरील विश्वास उडेल. हे रोखायचे असेल, तर अशा बेफिकीर अधिकाऱ्यांना कडक शासन हवेच!