
राज्यात हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसे आणि ठाकरे गटाकडून एकत्र मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर काल राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत.
आता सरकारने शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्राबाबत निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे 5 जुलै रोजी मनसे आणि ठाकरे गटाचा एकत्र होणारा मोर्चा रद्द करण्यात आला. त्याऐवजी विजयी सभा होणार आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिली. आता यावर ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी कोणाचीही समिती आता बसवली तरी आमच्यावर हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही, हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अनेक मराठी प्रेमी सहभागी होणार
संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावात आणि कानकोपऱ्यात जय महाराष्ट्राचा नारा परत एकदा बुलंद झाला. हा महाराष्ट्राचा नारा बुलंद करण्यात शिवसेना शिवसैनिक आघाडीवर होते. पण त्यासोबत ज्या ज्या राजकीय पक्षाने, ज्या ज्या मराठी भाषिकांनी आपपले पक्षभेद विसरुन सहभाग घेतला, त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देत आहे. सरकारला शहाणपण सुचलं की नाही हे येत्या काही दिवसात कळेल. पण तुर्तास त्यांनी हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला, मराठी माणसाची एकजूट ही आता झालेली आहे. जर त्यांनी रद्द केला नसता तर ५ तारखेच्या मोर्चात भाजपमधले, शिंदे गटातले आणि अजित पवार गटातील अनेक मराठी प्रेमी सहभागी होणार होते आणि होणार आहेत. त्यांनाही मी धन्यवाद देतो”, असा मोठा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी केला.
हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही
मातृभाषेचे प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असलं पाहिजे, सरकारने केविलवाणा प्रयत्न केलाय. तरीही त्यांना धन्यवाद देतोय. नवीन एक समिती नेमली, त्यात नरेंद्र जाधव आहेत. मी सरकारला सांगतोय की हा शिक्षणाचा विषय आहे आणि तुम्ही अर्थतज्ज्ञांची समिती नेमली आहे. समिती काही असली तरी सक्ती हा विषय आता संपलेला आहे. कोणाचीही समिती आता बसवली तरी आमच्यावर हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही, हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिले आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
एकजुटीचे दर्शन आम्ही ५ तारखेला घडवल्याशिवाय राहणार नाही
येत्या ५ जुलैला विजयी मेळावा किंवा विजयी मोर्चा नेमका काय आणि कुठे होईल हे दोन तीन दिवसात जाहीर करु. त्याबद्दलही आम्ही सर्वांशी बोलत आहोत. आपण जरा विखुरलेले आहोत हे समजताच मराठी द्रोही आपलं डोकं वर काढतात. काल आपण हे डोकं चेपलेलं आहे. चिरडून टाकलं आहे. जर पुन्हा त्यांचा फणा वर येऊ नये असे वाटतं असेल तर पुन्हा संकट येण्याची वाट बघण्यापेक्षा ही एकजूट आपण कायम ठेवली पाहिजे. या एकजुटीचे दर्शन आम्ही ५ तारखेला घडवल्याशिवाय राहणार नाही. ५ तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच. आम्ही सर्वांशी बोलतो आहोत. ज्याप्रमाणे आंदोलनात सर्वजण पक्षभेद विसरुन आमच्यासह एकत्र उतरले होते. तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवात दाखवणं गरजेचे आहे. गिरणी कामगारांसोबत आम्ही आहोत. त्यांनी याबद्दलची घोषणा केल्यानंतर आम्ही त्या मोर्चातही सहभागी होऊ, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.