
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड:तालुक्यातील मौजे धारासुर येथील प्राचीन, ऐतिहासिक आणि राज्य संरक्षित असलेले गुप्तेश्वर मंदिर हे श्रद्धास्थान जतन व संवर्धनाच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. या संदर्भात गुप्तेश्वर मंदिर बचाव संघर्ष समितीचे सक्रिय सदस्य निवृत्ती कदम धारासुरकर यांनी नुकतीच सांस्कृतिक कार्य मंत्री मा. आशिषजी शेलार यांची भेट घेऊन मंदिराच्या कामाची सद्यस्थिती मांडली.
सदर मंदिराचे जतन व पुनर्बांधणीचे काम शासनाच्या 28 कोटी 58 लाखांच्या दोन टप्प्यांत मंजूर केलेल्या योजनेंतर्गत सुरू असून, पहिल्या टप्प्यात 14 कोटी 95 लाखांची वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत मंदिराचा शिखर उतरवून मूळ पाया मजबुतीकरण, तसेच फाउंडेशनच्या चहुबाजूंनी संरक्षण भिंतीचे खोदकाम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
या कामांचे कंत्राट सवानी कंपनीकडे असून, आजपर्यंत सुमारे 2 कोटी 27 लाख रुपये खर्च करून पहिल्या टप्प्यातील कामावर देयके अदा करण्यात आली आहेत. त्यानंतर 6 मार्च 2025 पासून सुमारे 2 कोटी 38 लाखांच्या कामांना सुरुवात झाल्याचे निवृत्ती कदम यांनी ‘दैनिक चालू वार्ता’शी बोलताना स्पष्ट केले.
शासनाकडून अजूनही शिल्लक निधीचे नियोजन व पाठपुरावा सुरू असून, गुप्तेश्वर मंदिराचे जतन-संवर्धन, स्थानिक सांस्कृतिक वारशाचे जपणूक आणि धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.