
खून का बदला खून से सारखाच प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. सहा वर्षांपूर्वी भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी निर्दोष सुटलेल्या व्यावसायिकाची अपहरण करुन हत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या चितेगावमध्ये घडली आहे.
याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सहा वर्षांपूर्वी लहान भावाचा खून करणाऱ्याचा बदला घेण्यासाठी माजी सरपंचाने प्लॉटिंग व्यवसायिकाचे अपहरण करून हत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या चितेगावमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. शेख अकबर शेख महेमूद ऊर्फ मियाँभाई असे मयताचे नाव आहे.
चितेगाव येथील माजी सरपंच शेख वाहेद शेख याकुब यांचा लहान भाऊ शेख रऊफ यांचा सहा वर्षापूर्वी खून झाला होता. याप्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने 1 जानेवारी २०२५ रोजी दिलेल्या निकालात शेख अकबर यांच्यासह त्यांचे वडील, भाऊ व काका यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यावेळी वाहेद याकुब शेख यांनी मयत मयत शेख अकबर व त्यांच्या कुटुंबियांना तुमची जरी निर्दोष सुटका झाली असली तरी मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. त्यानुसार त्याने कट रचत अपहरण करून हत्या केली आहे. या प्रकरणी बिडकीन पोलीस पुढील तपास करत आहे.