
पाकिस्तानी पंतप्रधानांचे सल्लागार म्हणाले; आमच्याकडे केवळ ३० ते ४५ सेकंद…
एका वरिष्ठ पाकिस्तानी राजकारण्याने कबूल केले आहे की, त्यांच्या लष्कराकडे ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने डागलेल्या ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रात अण्वस्त्रे होते की नाही, याचे विश्लेषण करण्यासाठी अवघे ३० ते ४५ सेकंद होते.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे सल्लागार असलेल्या राणा सनाउल्लाह यांनी भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान अण्वस्त्र युद्धाचा धोका जास्त होता, असेही म्हटले आहे.
“जेव्हा भारताने नूर खान एअरबेसवर ब्रह्मोस डागले, तेव्हा येणाऱ्या क्षेपणास्त्रात अण्वस्त्रे असू शकतात का, याचे विश्लेषण करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराकडे फक्त ३०-४५ सेकंद होते. फक्त ३० सेकंदात यावर काहीही निर्णय घेणे ही एक धोकादायक परिस्थिती होती,” असे सनाउल्लाह यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला सांगितले. रावळपिंडीच्या चकलाला येथे नूर खान हे पाकिस्तानी हवाई दलाचे एक प्रमुख एअरबेस आहे.
“मी असे म्हणत नाही की, त्यांनी अणुबॉम्बचा वापर न करून चांगले केले, परंतु त्याच वेळी या बाजूच्या लोकांना त्याचा गैरसमज झाला असता, तर त्यामुळे पहिला अणुबॉम्ब डागण्यात आला असता आणि जागतिक अणुयुद्ध सुरू झाले असते”, असे ते पुढे म्हणाले.
पाकिस्तानी हवाई तळांचे नुकसान
ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताने अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले केले, ज्यामुळे धावपट्टी, हँगर आणि इमारतींचे नुकसान झाले होते. उपग्रह छायाचित्रांमध्ये सरगोधा, नूर खान (चकलाला), भोलारी, जेकबाबाद, सुक्कुर आणि रहीम यार खान या तळांवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.
भारताने नूर खान तळावर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. १९७१ च्या युद्धादरम्यान, भारतीय हवाई दलाच्या २० व्या स्क्वॉड्रनने त्यांच्या हॉकर हंटर्सने नूर खान हवाई तळाला लक्ष्य केले होते.
ऑपरेशन सिंदूर
भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिदीन सारख्या दहशतवादी संघटनांचे ९ तळ उद्ध्वस्त केले होते. याचबरोबर १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठारही केले होते.
भारताच्या या कारवाईनंतर, पाकिस्तानी सैन्याने भारताच्या पश्चिम भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली होती, जी भारतीय लष्कराने यशस्वीरित्या रोखली होती. त्यानंतर भारताने पाकिस्तानी हद्दीत खोलवर निवडक लष्करी लक्ष्यांवर हल्ले केले होते.