
शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर !
एकनाथ शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवरून विरोधकांनी रान उठवलं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला. गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे एकनाथ शिंदेंचं गुजरातवर प्रेम वाढलं आणि महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही, असं फडणवीस म्हणाले.
मराठी आणि हिंदी, मराठी-अमराठी, मराठी माणूस विरुद्ध परप्रांतीय असा वाद पेटला असतानाच, पुण्यातील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली. यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राज ठाकरे यांची मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून शिंदेंवर टीकेचा भडिमार केला जात आहे. आता सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः शिंदेंच्या बचावासाठी आणि विरोधकांची टीकेची धार कमी करण्यासाठी पुढे आले. शिंदेंच्या जय गुजरात घोषणेबाबत फडणवीसांना माध्यमांनी विचारणा केली असता, त्यांनी विरोधकांनाच सुनावले.
विरोधकांना सुनावताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ आपल्याला आठवण करून देतो की यापूर्वी एकदा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना शरद पवार यांनी जय महाराष्ट्र , जय कर्नाटक म्हणाले होते. याचा अर्थ कर्नाटकावर जास्त प्रेम आहे. महाराष्ट्रावर नाही असं समजायचं का? आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो, त्यामुळे त्यासंदर्भात बोलत असतो. गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं. त्यामुळे त्यांचं गुजरातवर प्रेम आणि महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही. मराठी माणूस वैश्विक आहे. याच मराठी माणसानं अटकेपार झेंडा नेलाय. याच मराठी माणसानं संपूर्ण भारताला स्वतंत्र केलंय. एवढा संकुचित विचार करत असेल तर ते चुकीचं आहे. विरोधकांकडे मुद्देच नाहीत. संपर्कही नाही. ते असे मुद्दे उचलतात की ते मुद्दे त्याचा लोकांवरही परिणाम होत नाही.
मिरा-भाईंदरच्या वादावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘भाषेवर मारहाण करणं अतिशय चुकीचं आहे. आम्ही मराठी आम्हाला अभिमान आहे. आग्रह चुकीचा नाही. पण व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं चुकीचं आहे. आपले मराठी भाषिक वेगवेगळ्या राज्यात व्यावसाय करतात. महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल’.
‘महाराष्ट्रात मराठी भाषा अभिमान ठेवणं चुकीचं नाही. भाषेवरून गुंडागर्दी करणारा सहन करणार नाही. ज्या प्रकारे घटना घडली, त्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. पुढे कुणी असा वाद केला तर कायदेशीर कारवाई होईल. मराठीचा अभिमान आहे. पण भारतातील कोणत्याही भाषेवर अन्याय केला जाऊ शकत नाही. मला आश्चर्य वाटतं की हे लोक इंग्रजीला जवळ करतात. हिंदी भाषेवर वाद करतात . हे कोणते विचार आहेत ही कोणत्या प्रकारची कारवाई आहे. अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, असे फडणवीस म्हणाले.
व्यापाऱ्यांच्या वादाचा काय अर्थ आहे. हे योग्य नाही. अशा प्रकारे वागणं योग्य नाही. खरा अभिमान असेल तर मराठीचा क्लास चालवा. मराठी बोलायला प्रवृत्त करा. आपली मुलं मराठीत शिकवा…मराठी शाळेत टाका. अशा शाळेत का टाकता की तिसरी भाषा मराठी आहे. व्यापाऱ्यांना मारणं योग्य नाही, असेही ते म्हणाले.