
दैनिक चालू वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
डहाणू तालुक्यातील गंजाड सोमनाथ खडकीपाडा येथे शुक्रवारी सकाळी सर्पदंशाने दहा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. वैशाली चिपात असे मृत मुलीचे नाव असून ती एका शेतकरी कुटुंबातील होती. तिच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वैशालीने आपल्या आई-वडिलांसाठी जेवण तयार करण्यासाठी घराच्या मागील झोपडीत लाकूड काढायला जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिला अचानक सापाने दोन वेळा दंश केला. वैशालीने जोरात आरडाओरड केल्यावर शेजाऱ्यांनी धाव घेत तिला तत्काळ गंजाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी तिला डहाणू येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला.मात्र, सकाळी सुमारे अकरा वाजता रुग्णवाहिकेतून डहाणूकडे नेत असताना वाटेतच वैशालीचा मृत्यू झाला. दुपारी वैद्यकीय प्रक्रिया आणि पोलीस कारवाईनंतर तिचा मृतदेह गंजाड खडकीपाडा येथे अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आला.दहा वर्षांची निष्पाप मुलगी अशी अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत असून परिसरात दुःखाचे वातावरण आहे. अनेक नागरिकांनी तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन संवेदना व्यक्त केल्या.