
गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असा राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा सोहळा शनिवारी मुंबईत पार पडला. महायुती सरकारच्या राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून त्रिभाषा धोरण आणि पर्यायाने हिंदी भाषेचे उदात्तीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू एकटवले होते.
गेल्या 20 वर्षांपासून या दोघांमध्ये राजकीय आणि कौटुंबिक दुरावा होता. मात्र, मराठीच्या मुद्द्यावरुन शनिवारी मुंबईत पार पडलेल्या सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एका व्यासपीठावर आले. त्यांचे एकत्र येणे ही ठाकरे गट आणि मनसेच्या भविष्यातील राजकीय युतीची नांदी मानली जात आहेत.
त्यामुळे साहजिकच महायुतीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली होती. गेल्या काही वर्षांमध्ये महायुतीच्या नेत्यांनी विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी राज यांच्या रुपाने ठाकरे ब्रँड आपल्या बाजूने कसा राहील, याची काळजी घेतली होती. परंतु, गमवायला काहीच शिल्लक नसलेल्या आणि राजकीय अस्तित्व टिकवण्याची नितांत गरज, या दोन गोष्टींमुळे एकमेकांचे तोंडही पाहण्यास तयार नसलेले ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे साहजिकच भविष्यात महायुतीच्या राजकारणाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज-उद्धव ठाकरे कालच्या मेळाव्यात एकत्र येताच महायुतीमधील भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ठाकरे बंधूंवर टीका सुरु केली होती. ठाकरे बंधू कशाप्रकारे स्वार्थासाठी आणि फक्त निवडणुकीसाठी एकत्र येऊ पाहत आहेत, असा एककलमी अजेंडा असणारी टीकात्मक वक्तव्यं महायुतीच्या नेत्यांकडून केली जात होती. महायुतीच्या या टीकेला राज ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेता म्हणून ओळख असणाऱ्या संदीप देशपांडे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
संदीप देशपांडे यांनी ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये संदीप देशपांडे यांनी राज-उद्धव ठाकरे आणि महायुतीच्या नेत्यांचा रांगेत बसलेला एक फोटो शेअर केला आहे. महायुतीच्या नेत्यांच्या फोटोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण, शिवसेना आणि काँग्रेस असा प्रवास केलेले नारायण राणे, एकेकाळी भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केलेले छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आदी नेत्यांचा समावेश आहे. राज-उद्धव यांच्या फोटोवर सत्तेसाठी एकत्र आले आहेत तर मग महायुतीचे नेते कशासाठी एकत्र आले आहेत, असा परखड सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.