
छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या ‘त्या’ विधानामुळे नवा वाद !
महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. राज्य शासनाने हिंदी सक्तीबाबात जी.आरला राज्यभरातून तीव्र विरोध झाला. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने या निर्णायाविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे शासनाला अखेर तो जी.आर रद्द करावा लागला.
शासन निर्णय रद्द केल्यानंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईत संयुक्त विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना उद्धव आणि राज ठाकरेंनी हिंदी भाषेच्या सक्तीवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. शिवाय मराठी भाषेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा देखील त्यांनी या मेळाव्यातून दिला.
मात्र, याच मेळाव्यावर आणि ठाकरेंच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेकडून टीका केली जात आहे. अशातच आता हिंदी भाषेचे समर्थन करताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “छत्रपती संभाजी महाराज 16 भाषा शिकले. मग ते मुर्ख होते का? असं धक्कादायक विधान त्यांनी केलं आहे.
संजय गायकवाड काय म्हणाले?
आमदार गायकवाड म्हणाले, “विषय फक्त हिंदीचा नाही. जगात आज टिकायचं असेल तर तुम्हाला अनेक भाषा अवगत झाल्या पाहिजेत. छत्रपती संभाजी महाराज 16 भाषा शिकले. मग ते मुर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते.
ताराराणी, येसूबाई, जिजाऊमाँसाहेब अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषेसह मग हे लोकं मुर्ख होते का? त्यामुळे यावरून राजकारण करून मतांचं राजकारण करणं चुकीचं आहे, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.
तसंच आपण पर राज्यात गेल्यावर तिथे मराठीत बोलणार का? जगात टीकायचे असेल तर सगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत. पाकिस्तानचा दहशतवाद ओळखायचा रोखायचा असेल तर आपणाला उर्दू भाषा देखील शिकली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.