
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरशेळकी येथील समर्थ धोंडुतात्या मंदिरात आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त माजी मंत्री व उदगीर-जळकोट मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते मंत्रोच्चार व भक्तिभावपूर्ण वातावरणात आरती करण्यात आली.
यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधताना आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले की, “मतदारसंघातील जनतेच्या सुख-समाधानासाठी, शेतकरी बांधवांच्या भरभराटीसाठी व पिकांसाठी पुरेसा पाऊस व्हावा, यासाठी समर्थ धोंडुतात्यांच्या चरणी नतमस्तक होऊन साकडे घातले आहे.”
या प्रसंगी तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, प्रा. श्याम डावळे, माजी उपसभापती रामराव बिरादार, माजी नगरसेवक विजय निटुरे, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, उपसरपंच गणपत पवार, प्रभाकर पाटील, हनुमंतराव हंडरगुळे, अभिषेक बरुरे, राहुल पुंड, मारुती मुंडे, बंडू मुंडे, ज्ञानोबा मुंडे, हनुमंत मुंडे, व्यंकटराव मरलापल्ले, नरसन मरेवाड, चंद्रपाल शेळके यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. संजय बनसोडे पुढे म्हणाले की, “शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध व्हावे, त्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळावे यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. मंत्री असताना डोंगरशेळकी येथील समर्थ धोंडुतात्या मंदिर संस्थानला ‘ब’ दर्जा मिळवून देण्यात आला. याचबरोबर मंदिर परिसर व गावाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून विकासकामे हाती घेण्यात आली. येत्या काळातही गावाच्या आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.”
या भक्तिपर्वाला उदगीर आणि लातूर जिल्ह्यातील हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने उपस्थिती लावली होती. टाळ-मृदंगाच्या गजरात व हरिनाम संकीर्तनात परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.