
महाराष्ट्रातले भाजपवाले ठाकरे बंधूंची दादागिरी नाकारतात, पण ते हिंदी भाषकांची मस्तवाल मुजोरी का खपवून घेतात??, असा सवाल महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भाजपवाल्या नेत्यांच्या राजकीय वर्तणुकीतून आणि वक्तव्यातून समोर आलाय
महाराष्ट्रात राहून मराठी बोलता येत नाही. मराठी बोलणार नाही, या मुद्द्यावरून राज ठाकरेंच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही व्यापाऱ्यांना ठोकले. त्या मुद्द्यावरून भाजपचे नेते आक्रमकरीत्या प्रतिक्रिया व्यक्त कर्ते झाले. महाराष्ट्रात परप्रांतीयांना मारहाण करणे खपवून घेतले जाणार नाही, महाराष्ट्रात मराठीचा आग्रह जरूर धरा पण दुराग्रह नको, अशी वक्तव्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. महाराष्ट्रात परप्रांतीयांना मारहाण झाली, तर त्याचे पडसाद इतर प्रांतांमध्ये उमटून घेतल्या मराठी माणसांना लोक मारतील, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.
पण या सगळ्यामध्ये त्यांचा मराठीचा रास्त अभिमान दिसला, तरी त्यांनी फक्त ठाकरे बंधूंच्या दादागिरीचा निषेध केलेला आढळला. पण या सगळ्या प्रकरणानंतर सुशील केडियाने केलेली मुजोरी, खासदार पप्पू यादवने दिलेले धमकी, भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ याने केलेली दमबाजी आणि त्यापलीकडे जाऊन भाजपचे बडबोले खासदार निशिकांत दुबे यांनी केलेली शेरेबाजी यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री काही बोलल्याचे समोर आले नाही.
सुशील केडिया 30 वर्षे मुंबईत राहून मराठी शिकला नाही. त्याने त्याचे समर्थन केले. नंतर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींमध्ये दादागिरी केली. मी मराठीत बोलणार नाही, हा धोषा कायम लावला. पण त्याला भाजपचे नेते काही बोलले नाहीत.
सुशील केडियाच्या कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी नारळ फेकून मारले. त्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष मंत्री आशिष शेलार यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची तुलना पहलगाम मधल्या जिहादी दहशतवादी हल्लेखोरांशी केली. त्यांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठली समज दिलेली समोर आले नाही.
मी मुंबईत येऊन हिंदी बोलून दाखवतो. ठाकरे बंधूंची हिंमत असेल तर त्यांनी मला हात लावून बाहेर काढून दाखवावे, अशी पप्पू यादवने दमबाजी केली. त्याच पद्धतीने अभिनेता निरहुआ बोलला आणि निशिकांत दुबे यांनी तर “आपने घर मे कुत्ता भी शेर होता है” अशी शेरेबाजी केली. याबद्दल देवेंद्र फडणवीस किंवा बावनकुळे काही बोलले नाहीत. जशी ठाकरे बंधूंची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, तशीच हिंदी भाषकांची मुजोरी देखील आम्ही खपवून घेणार नाही, असे खरं म्हणजे दोघांनी बोलायला हवे होते. किंबहुना तशी राजकीय कृती करायला हवी होती. कारण सरकार म्हणून त्यांची ही जबाबदारी होती आणि आहे. पण फडणवीस आणि बावनकुळे ही जबाबदारी पार पाडताना आज तरी दिसले नाहीत.