
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी फरार असल्यावरून खरगे आक्रमक…
संसदेच्या आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम दहशतवादी हल्ला या मुद्द्यांवरून लोकसभा आणि राज्यसभेत जोरदार गोंधळ पाहायला मिळाला.
विरोधकांनी या मुद्द्यांवर तातडीने चर्चा घेण्याची मागणी केली. त्यामुळे दोन्ही सभागृहे काही काळासाठी स्थगित करण्यात आली.
राज्यसभेत खरगेंचा हल्लाबोल
राज्यसभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यांनी म्हटले की, “पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही फरार आहेत. ना त्यांना पकडले गेले, ना मारले गेले.
जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर यांनी देखील कबूल केले आहे की, हे इंटेलिजन्स फेल्युअर होते. अशा संवेदनशील घटनेवर सरकारने खुलासा करावा. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी सर्वच पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला होता. मग आता आम्ही उत्तर मागितल्यावर शांतता का ?
नड्डां म्हणाले- आम्ही चर्चा करू
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी खडगेंच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले, सरकारला कोणत्याही चर्चा टाळायची नाही. देशात असा संदेश जाऊ नये की सरकार ऑपरेशन सिंदूरवर चर्चा टाळत आहे. आम्ही सर्व मुद्द्यांवर चर्चा करू. ऑपरेशन सिंदूरमधील सर्व टप्प्यांची माहिती संसदेत मांडली जाईल.
लोकसभेतही घोषणाबाजी; अध्यक्षांचा इशारा
लोकसभेत विरोधकांनी नारेबाजी करताच सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना फटकारले. ते म्हणाले, प्रश्नोत्तर कालावधीनंतर ऑपरेशन सिंदूरवर चर्चा घेतली जाईल. सरकार सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. मात्र, पहिल्याच दिवशी असा गोंधळ घालणं योग्य नाही. आपल्याला हे वर्तणुकीचे मिथक मोडावे लागेल.
INDIA आघाडीची रणनीती
सत्राआधी I.N.D.I.A. आघाडीने बैठक घेतली. या बैठकीत खालील मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची रणनीती ठरवण्यात आली. ऑपरेशन सिंदूर, भारत-पाक संघर्षविराम, ट्रम्प यांचे युद्धबंदीचे दावे, बिहार मतदार यादीतील गोंधळ या सर्व मुद्द्यांवर विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून थेट उत्तर मागत आहेत.
अधिवेशनाविषयी…
पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 21 ऑगस्ट पर्यंत चालेल. एकूण 15 पेक्षा जास्त विधेयके मांडली जाणार आहेत. मणिपूर GST सुधारणा विधेयक 2025, नवीन इनकम टॅक्स बिल (1961 च्या कायद्याची जागा घेणारे), राष्ट्रीय क्रीडा प्रशासकीय सुधारणा विधेयक अशा महत्वाच्या विधेयकांचा यात समावेश आहे.