
पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ‘हे’ पदही सोडणार…
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली. त्यानंतर आणखी एकदा मुश्रीफ धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
घरात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, खासदार, आमदार म्हणून महाडिक गटावर टीका करण्यात आली होती. त्याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आता मंत्री मुश्रीफ देखील कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
घरात पालकमंत्रीपद, मंत्रीपद आहे, गोकुळ अध्यक्षचे पद आहे, जिल्हा बँक अध्यक्षाचे पद आहे. त्यामुळे बँकेच्या कामकाजात लक्ष देण्यास वेळ नसल्याने मंत्री हसन मुश्रीफ वार्षिक सभेत राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
सांगली येथील एका कार्यक्रमात मंत्री मुश्रीफांनी त्यासंदर्भात सुतवाच केले आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा आपण लवकरच राजीनामा देणार असल्याचे सोमवारी रात्री स्पष्ट केले.
जिल्ह्यातील सर्व प्रमुख केंद्रांचे पदे एकाच घरात आहेत. मंत्री असल्याने बँकेच्या कारभारात लक्ष देता येत नाही. त्यामुळे राजीनामा देत असल्याचे मुश्रीफ यांनी सांगली येथे जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात स्पष्ट केले.
गेल्या 40 वर्षांपासून मंत्री मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक आहेत. त्यातील जवळपास 13 वर्षे हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अडचणीत आलेल्या जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती भक्कम करण्यात मंत्री मुश्रीफ यांचा मोलाचा वाटा आहे.
अशातच ते राजीनामा देणार असल्याच्या चर्चेने राजकीय खळबळ उडाली आहे. मंत्रि मुश्रीफ येत्या वार्षिक सभेत आपला राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या राजीनाम्यानंतर ए.वाय पाटील, भैय्या माने, बाबासाहेब पाटील आसुरलेकर त्यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.