
शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून मुंबई गाठणार !
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं निघणार आहे. मुंबईत 29 ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी मोर्चा होईल. मराठा आरक्षणाशिवाय मागे न फिरण्याचा निश्चय मनोज जरांगे यांनी केला आहे.
मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी आरपारच्या लढाईची तयारी केली असून, मुंबई गाठण्यासाठी लांबचा प्रवास टाळला आहे. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून मनोज जरांगे जाणार असल्याचे निश्चित झालं आहे.
मराठा(Maratha)समाजाच्या आरक्षणासाठी 29 ऑगस्टला मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा होईल. पहिल्याच्या तुलनेत हा मोर्चा पाचपटीने अधिक विराट असेल. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आंतरवाली सराटी इथं काही दिवसांपूर्वी राज्यस्तरीय बैठक झाली. यानंतर महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा मोर्चाच्यावतीने बैठकांचा सत्र सुरू आहे. या बैठकांना देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुंबईतून (Mumbai) यावेळी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही, असा निश्चय मनोज जरांगे यांनी केला. बैठकीत मराठा समाजाला भावनिक आवाहन देखील ते करताना दिसत आहे. शरीर साथ देत, ही माझी शेवटची लढाई असू शकते. मुंबईत आलो, तर आरक्षणाशिवाय मागे फिरणार नाही, असा इशारा देत आरपारची लढाई लढण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
आझाद मैदान तुटुंब भरणार
मुंबईकडे जाणाऱ्या मोर्च्याची रणनीती ठरली असून, गेल्या वेळी मराठा समाजाचा मोर्चा लोणावळा मार्गे मुंबईला नेण्यात आला होता. परंतु यावेळी हा मोर्चा शिवनेरीवर नतमस्तक होऊन माळशेज घाट मार्गे कल्याण-ठाणे चेंबुरवरुन आझाद मैदानात जाणार आहे.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून मोर्चा जाणार
गेल्यावेळी मोर्चाला मुंबईत वाशी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोरे गेले होते. मात्र त्यानंतर आजपर्यंत मराठा समाज आरक्षणावर तोडगा निघाला नाही. आता आम्ही कुणाच्याही सांगण्यावरुन थांबणार नाही, असेही मनोज जरांगेंनी म्हटले आहे. माळशेज घाटातून खाली उतरल्यावर मराठा समाजाचा हा मोर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातून जाणार आहे. कल्याण मार्गे जवळचा रस्ता असल्याने हा मार्ग निवडल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.
फडणवीसांमुळे शिरसाटांनी पडताळणी रोखल्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मंत्री संजय शिरसाट यांना मराठा जात प्रमाणपत्राच्या पडताळणी प्रमाणपत्र रोखण्याचा आदेश दिल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. मला मिळालेली माहिती खरी असून असले चाळे बंद करा. प्रमाणपत्र रोखू नका. अन्यथा वेळ वाईट येईल, असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिला आहे.