
संजय राऊतांचा खळबळजनक दावा !
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवशीच त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसलेल्या या सरकारने राजीनामा देऊन शेतकऱ्यांना भेट द्यावी,” अशी मागणी करत राऊत यांनी सरकार पाडण्यासाठी ‘हनी ट्रॅप’ आणि ‘पेन ड्राईव्ह’चा वापर झाल्याचा गंभीर आरोप केला. महाराष्ट्राच्या राजकारणाचा कोठा झाला असून त्याची हमीदाबाई दिल्लीत बसली आहे, अशा तिखट शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला.
शिंदेंसोबत फक्त ८ आमदार होते, बाकीचे भाजपने पाठवले”
सरकार स्थापनेच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राऊत म्हणाले, एकनाथ शिंदेंची ताकद फक्त ८ आमदारांची होती, त्यातील दोन तर तळ्यात-मळ्यात होते. उरलेले आमदार अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनीच पाठवले. त्यासाठी पेन ड्राईव्ह, हनी ट्रॅप अशा गोष्टींचा वापर झाला आणि आमचं सरकार पाडण्यात आलं. आमचे चार खासदारही याच कारणामुळे गेले. ते ट्रॅप कुठे लावले, ती जागाही मी सांगू शकेन, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला.
‘प्रफुल्ल लोढा छोटा मासा, मोठा मासा मंत्रिमंडळात’
सध्या गाजत असलेल्या प्रफुल्ल लोढा प्रकरणावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. प्रफुल्ल लोढा हा एक छोटा मासा आहे, या प्रकरणातील मोठा मासा तर मंत्रिमंडळात बसला आहे. लोढा कोणत्या पक्षात होता, तो कोणाला पेढे भरवतोय आणि व्हिडिओमध्ये कोणाचं नाव घेतोय, हे सर्वांनी पाहावं, असे म्हणत त्यांनी या प्रकरणाची पाळेमुळे थेट सरकारपर्यंत पोहोचत असल्याचा आरोप केला.
हीच का तुमची कायदा-सुव्यवस्था, मिस्टर फडणवीस ?
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवत राऊत यांनी अहमदनगरमधील किरण काळे प्रकरणाचा उल्लेख केला. ते म्हणाले:
अहमदनगरमध्ये किरण काळे यांनी ४४० कोटींचा आयटी पार्क घोटाळा बाहेर काढला.
त्यांच्यावर लगेच बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून २४ तासांत अटक केली जाते.”
दुसरीकडे, कोकाटे, राठोड आणि संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप असूनही त्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत.
या राज्यात आंदोलनाचा अधिकार नाही का? हीच का तुमची कायदा आणि सुव्यवस्था, मिस्टर फडणवीस? असा थेट सवाल त्यांनी गृहमंत्र्यांना केला.
सप्टेंबरमध्ये राजकीय उलथापालथीचे संकेत
राऊत यांनी केवळ राज्यच नव्हे, तर राष्ट्रीय राजकारणावरही भाष्य केले. पडद्यामागे काहीतरी गडबड सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. भाजपमधील एक मोठे नेते वयाची ७५ वर्षे पूर्ण करत असून, त्यांना उपराष्ट्रपती बनवण्यासाठी सध्याच्या उपराष्ट्रपतींचे पद रिकामे केले जात असावे,असा संशय त्यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना ‘जाणकार नेते’ म्हणतच, त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे कल्याण करावे, असा सल्लाही दिला. मी कधीही माघार घेतली नाही, पुरावे तपासा, असे म्हणत त्यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे.