
राज्यात डान्सबारला बंदी असताना कांदिवली येथील ‘सावली बार अॅण्ड रेस्टॉरंट’मध्ये डान्सबार सुरू होता. या बारचा परवाना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती रामदास कदम यांच्या नावावर आहे.
पोलिसांनी छापा टाकला तेव्हा २२ बारबाला अश्लील नृत्य करत होत्या. हा बारबालनांचा ‘पिकअप पॉइंट’ होता, असा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे आमदार ॲड. अनिल परब यांनी केला होता.
यावर रामदास कदम म्हणाले होते की, “अनिल परब हे अर्धवट वकील आहेत आणि या अर्धवट वकिलाच्या सल्ल्याने उद्धव ठाकरे चालतात, त्यामुळेच त्यांची अशी अवस्था झाली आहे. आमचा तो बार गेल्या ३० वर्षांपासून एक शेट्टी नावाचा इसम चालवतो आहे. हे वास्तव आहे की त्या हॉटेल आणि बारचा परवाना माझ्या पत्नीच्या नावावर आहे. तसेच तिच्या नावावर ऑर्केस्ट्राचा परवाना देखील आहे. मुलींचं वेटरचं लायसन्स देखील आमच्याकडे आहे. परंतु ते काही अनधिकृत नाही. तिथे अनधिकृतपणे डान्स चालत नाही.
कदम यांना प्रत्युत्तर देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) आमदार अनिल परब म्हणाले की, “मी राज्याचे गृहराज्यमंत्री व महसूल मंत्री यांच्यावर आरोप केले. माझे आरोप होते की, त्यांच्या मातोश्रींच्या नावावर असलेला जो बार आहे, त्या बारमध्ये डान्सबार चालवला जात होता, अश्लील नृत्य केलं जात होतं, पैसे उडवले जात होते. ही सर्व माहिती माहितीच्या अधिकारातून मला मिळालेली आहे. त्यामुळे ही माहिती खोटी असू शकत नाही. मिळालेल्या माहितीमध्ये २२ बारबाला, २२ ग्राहक आणि चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
ते पुढे म्हणाले की, “बारचे सर्व नियम तर तुडवले गेलेच आहेत, परंतु याबाबतीत खुलासा करताना माजी मंत्री रामदास कदम यांनी सांगितले की, माझ्या (रामदास कदम) पत्नीच्या नावावर बार आहे, त्यामुळे यात आता काही वाद नाही. पोलिसांच्या नाकाखाली गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार चालतो. हे गृहराज्यमंत्री नवी मुंबईपर्यंत ही अश्लील कृती आहे, समाजविघातक कृती आहे म्हणून डान्सबारवर रेड टाकायला जातात. पण स्वतःच्या आईच्या नावावर असलेल्या बारमध्ये डान्सबार चालतो, त्यावर कोण कारवाई करणार?
त्यांनी माझा उल्लेख अर्धवट वकील म्हणून केला. पण त्यांनी लक्षात घ्यावे, तिथे मी आमदार म्हणून बोलतो, वकील म्हणून नाही. ही माझ्या आमदारकीची चौथी टर्म आहे. त्यामुळे विधानसभेचे नियम आणि कायदे मला चांगले माहिती आहेत. ते म्हणतात की, डान्सबार आम्ही चालवत नाही, चालवायला दिलेला आहे. मी माहितीसाठी कायद्यातील तरतुदी सांगतो, नोकराने किंवा ज्याला प्राधिकृत केले आहे, त्याने दुष्कृत्य केले, तर त्याची जबाबदारी मालकाचीच असते.