
अजितदादा ही विनाशकाले विपरीत बुद्धीच..
वाल्मीक कराड हा जेलमधून लोकांना फोन करतोय. हे शाॅकिंग आहे, आत्मघातकी दहशतवाद्यापेक्षा हे भयानक आहे. गृहमंत्री फडणवीस साहेब हे रोखा, नाहीतर या राज्यात पुन्हा मर्डर पडतील, अशा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
वाल्मीक कराडला पाठिंबा देणाऱ्या माजी मंत्र्याला तुम्ही पुन्हा मंत्री करायला निघालात, ही अजितदादा तुमची विनाशकाले विपरीत बुद्धीच आहे, अशी टीकाही जरांगे पाटील यांनी केली.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मीक कराड हा जेलमधून फोन करतो. माझ्या समोर बसलेल्या एका व्यक्तीला वाल्मीक कराडचा फोन आला होता, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. याचा दाखला देत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त हे आपल्यासाठी आणि राज्यासाठी शाॅकिंग असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्रीही असलेल्या फडणवीसांनी हे थांबवावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मीक कराड (Walmik Karad), त्याचा मुलगा आणि गुंडाचा हात असल्याचा दावा विजयसिंह उर्फ बाळा बांगर याने काही दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. तसेच वाल्मीक कराड याने जेलमधून 42 सराईत गुन्हेगारांचा जामीन करवून त्यांना बाहेर काढले. तेच लोक आता बीडमध्ये आणि राज्यात वाल्मीकचे काम करत असल्याचा दावा केला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी आपल्यासमोर बसलेल्या व्यक्तीला वाल्मीक कराड याचा जेलमधून फोन आल्याचा आरोप केला.
यावर मनोज जरांगे पाटील यांनी कठोर शब्दात भाष्य केले. जेलमधून वाल्मीक कराड लोकांना फोन करतो हे ऐकून शाॅक बसला, राज्यासाठी हे शाॅकिंग आहे. गृहमंत्री फडणवीस साहेबांनी हे रोखलं पाहिजे, नाहीतर राज्यात पुन्हा मर्डर पडतील. आत्मघातकी दहशतवाद्यापेक्षा हा प्रकार भयंकर आहे. दुसरीकडे ज्या माजी मंत्र्याने वाल्मीक कराडची पाठराखण केली, त्याला म्हणे अजितदादा पुन्हा मंत्री करणार आहेत. याला विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्हणतात, अजितदादा असे निर्णय घेऊ नका, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
कृषीमंत्री असताना धनंजय मुंडे यांच्या खात्याने खरेदी केलेल्या साहित्य घोटाळा प्रकरणात कोर्टाने त्यांना क्लीन चीट दिली आहे. या संदर्भात माध्यमाशी बोलताना अजित पवार यांनी धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली, त्यांना किती सहन करावे लागले, असे सांगत मुंडे यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळात घरवापसी होणार, अशा चर्चांना उधाण आले होते. याचा संदर्भ देत मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांनाही टोला लगावला.