
क्षणार्धात पाच मजली इमारती कोसळल्या; भीषण ढगफुटीचा व्हिडिओ व्हायरल…
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात तुफान पाऊस सुरु असून इथल्या हर्षिल भागातील खीर गंगा नदीजवळ भीषण ढगफुटी झाली. यामुळं उंच डोंगरातून मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या प्रवाहासह मातीचा चिखल अतिशय भीषण पद्धतीनं खाली वाहत आला.
यामध्ये खीर गंगा हे गाव पूर्णपणे यात वाहून गेलं असून अनेक इमारती एका प्रवाहातच जमीनदोस्त झाल्या.
यामध्ये अनेक जण या चिखलाखाली गाडले गेले आहेत. आत्तापर्यंत प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. पण या दुर्घटनेचा व्हिडिओ पाहून शेकडो जणांचा मृत्यू झाल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
गंगोत्रीला जातानाच्या मार्गावर धराली हा एक महत्वाचा टप्पा आणि थांबा आहे. धराली इथूनच खीर गंगा नदी वाहते, ही नदी डोंगरातून खाली वाहत जाते या नदीच्या पात्रात ढगफुटीमुळं प्रचंड पाण्याचा प्रवाह वाहू लागला. या पाण्याच्या प्रवाहासोबत मोठ्या प्रमाणावर माती देखील खाली वाहून आली. अचानक आलेल्या या भीषण पुरामुळं विनाशकारी दृश्य पाहायला मिळालं. यामध्ये अनेक हॉटेल्स, होमस्टे आणि गावातील घरच्या घरं वाहून गेली. केवळ ३० सेकंदाच्या या व्हिडिओ डोंगरातून प्रचंड वेगान वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात संपूर्ण गाव वाहून गेल्याचं दिसतं आहे.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, धाराली भागात ढगफुटी झाल्याची माहिती मला मिळाली आहे. यामुळं खूपच वेगानं पाण्यासोबत चिखल वाहत आला यामध्ये अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर वाचवलं जावं यासाठी तातडीनं बचाव कार्य राबवण्याचा आमच्या प्रयत्न सुरु आहे. जिल्हा प्रशासनाचे लोक घटनास्थळी पोहोचत आहेत, त्याचबरोबर आपलं सैन्य दलंही पोहोचणार आहे. त्याबरोबर एनडीआरएफ, एसडीआरएफ बचाव कार्यात सक्रीय झाले आहेत. सध्या आमची हीच प्राथमिकता आहे की सर्वांना वाचवलं जावं आणि बचाव कार्य मोठ्या प्रमाणावर राबवलं जावं.
संपूर्ण क्षेत्रच असंवेदनशील
दरम्यान, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचं म्हणणं आहे की, इथला संपूर्ण हिमालयाचा भाग अशा नैसर्गिक दुर्घटनांच्या क्षेत्रात येतो, वारंवार इथं अशा भीषण नैसर्गिक घटना घडत असतात. त्यामुळं यावर राष्ट्रीय स्तरावर विचारविनियम करण्याची गरज आहे.