
थेट नागपूर महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांचा आकडाच जाहीर केला !
सध्या राज्यात वोट चोरीचा मुद्दा तापत असून भाजप नेत्यांच्या दाव्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे. ते बोलतात तेवढेच लोकप्रतिनिधी तंतोतंत निवडून कसे काय येतात? असा सवाल व्यक्त केला जात आहे. असे असताना शनिवारी राज्याचे महसूलमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर महापालिकेत निवडून येणाऱ्या नगरसेवकांचा आकडाच जाहीर केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नागपूर महापालिकेत यंदा भाजपचे 120 नगरसेवक निवडून येणार असल्याचा दावा त्यांनी केलाय.
नागपूरमधील बडकस चौकातील जन्माष्टमीनिमित्त आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात बावनकुळे यांनी उपरोक्त आकडा जाहीर केला. मध्य नागपूरचे भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बावनकुळे यांच्या भाषणामुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच जोष निर्माण झाला होता. यावेळी बावनकुळे एवढ्यावरच थांबले नाहीत.
ते म्हणाले, मध्य नागपूरमध्ये विरोधकांचा एकही नगरसेवक निवडून येणार नाही. आपले पूर्ण त्यांचे शून्य असा संकल्प करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहात चांगलीच भर पडली होती. बावनकुळे मंचावर येताच त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोष भरण्यास सुरुवात केली. आपल्या भाषणाला सुरुवात करताच त्यांनी पहिला प्रश्न डिसेंबर, जानेवारी महिन्यात काय आहे अशी विचारणा केली. प्रेक्षकांमधून महापालिकेची निवडणूक असा प्रतिसाद येताच त्यांनी आपल्याला काय करायचे आहे अशी विचारणा केली.
ते म्हणाले, यावेळी महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याला आणखी मोठ्या विक्रमाची नोंद करायची आहे. यावेळी आपले 120 नगरसेवक निवडून येणार आहे. त्यामुळे तुम्ही कामाला लागा असे ते म्हणाले. मध्य नागपूरमध्ये आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात आपल्याला निवडणूक लढायची आहे, आज जन्माष्टमीचा भंडारा घ्या आणि उद्यापासून निवडणुकीच्या कामाला लागा असेही ते म्हणाले.
विशेष म्हणजे यापूर्वीच्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 108 नगरसेवक निवडून आले होते. नागपूर महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात भाजपला प्रथमच स्वबळावर सत्ता स्थापन करता आली होती. 2017ची महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आटोपताच भाजपचे तत्कालीन शहर अध्यक्ष, माजी आमदार सुधाकर कोहळे आणि आमदार प्रवीण दटके यांनी 108 नगरसेवक निवडून येतील असा दावा केला होता. त्या दाव्यानंतर तंतोतंत तेवढेच नगरसेवक भाजपचे निवडून आले होते, हे विशेष. त्यावेळी सर्वांचा अंदाज 80 ते 85 नगरसेवक निवडून येतील असेच राजकीय चित्र शहरात होते. भाजप नेत्यांनी सांगितलेला आकडा अचूक ठरल्याने आजही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.