
5 हजार कोटींची जमीन ‘त्या’ कुटुंबाला दिली; रोहित पवारांनी पुरावे दाखवले…
मागील काही काळापासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री अडचणीत येत आहेत. त्यातच शिंदे मुख्यमंत्री असताना सिडकोचे अध्यक्ष म्हणून घेतलेला एक निर्णय संजय शिरसाट यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदमध्ये शिरसाट यांनी तब्बल पाच हजार कोटी रुपयांची जमीन एका कुटुंबाला ते सिडकोचे अध्यक्ष असताना पहिल्याच बैठकीत दिल्याचा आरोप केला. तसेच त्या संदर्भातील कागदपत्रे देखील दाखवली.
रोहित पवार म्हणाले, मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटीशांना मदत केल्याप्रकरणी नवी मुंबई परिसरातील सुमारे चार हजार एकरहून अधिक जमीन ब्रिटीशांनी बिवलकर नावाच्या कुटुंबाला दिली होती. नंतरच्या विविध कायदे, नियम आणि निकालानुसार ही जमीन सरकारजमा झाली. त्यांनी परत मिळवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, ती त्यांना मिळाली नव्हती. संजय शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्षपद मिळताच पहिल्याच बैठकीत ती जमीन बिवलकर कुटुंबाला देऊन टाकली.
विद्यमान मंत्री संजय शिरसाट साहेब यांनी २०२४ मध्ये सिडकोचे अध्यक्ष होताच सगळे नियम बाजूला सारून पहिल्याच बैठकीत यातील सुमारे 15 एकर जमीन या बिवलकर कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला. या जमिनीचा बाजारभाव सुमारे 5 हजार कोटी रुपये असून या जमिनीवर सिडकोला गरीबांसाठी सुमारे 10 हजार घरं बांधता आली असती, पण गरीबांच्या हक्काची जमीन शिरसाठसाहेब यांनी बिवलकर कुटुंबाच्या घशात घातली.’, असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला.
शिरसाट यांचा राजीनामा घ्या…
एकीकडं पाच हजारहून अधिक स्थानिक भूमिपुत्र जमिनीसाठी वर्षानुवर्षे संघर्ष करत आहेत त्यांना जमीन दिली जात नाही पण मराठा साम्राज्याविरोधात काम करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीरपणे पहिल्याच बैठकीत जमीन दिली जाते, ही एकप्रकारे भूमिपुत्रांच्या बाबतीतही गद्दारीच आहे. त्यामुळं बेकायदा पद्धतीने बिवलकर कुटुंबाला दिलेल्या या जमिनीसह राज्यातील अशा प्रकारच्या सर्वच जमिनी सरकारने परत घ्याव्यात आणि मंत्री संजय शिरसाठ यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.