
पोलिसांऐवजी मुलींवरच गुन्हा दाखल;पुण्यात वातावरण तापलं…
शहरात कोथरूड पोलिसांवर मारहाण व जातीवाचक शब्दांत शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या तिन्ही मुलींवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्वेता पाटील आणि अन्य तीन जणांसह एकूण पाच जणांविरोधात पुणे पोलिसांनी कारवाई केली असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिसांवर आरोप, पण गुन्हा मुलींवरच
कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि शिवीगाळ केली, असा गंभीर आरोप या तरुणींनी केला होता. परंतु याच घटनेत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा या मुलींवरच दाखल करण्यात आला. बंडगार्डन पोलीस ठाण्यात कलम 132 अंतर्गत ही नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेलं परिपत्रक श्वेता पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांनी फाडून टाकलं होतं, असा ठपका ठेवूनही गुन्हा दाखल करण्यात आला.
ठिय्या आंदोलन आणि राजकीय रंग
या प्रकरणानंतर श्वेता पाटील व अन्य चार जणांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर रात्रभर ठिय्या मांडला होता. त्यांची मुख्य मागणी म्हणजे – कोथरूड पोलिसांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, परंतु आता याच तरूणींविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळतेय.
दरम्यान, या आंदोलनाला राजकीय पाठींबा मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार, तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली आंबेडकर व सुजात आंबेडकर हे देखील या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. मात्र आंदोलनादरम्यान या नेत्यांवर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही, यावरूनही चर्चेला उधाण आलं आहे.