
घडवली जन्माची अद्दल…
मेरठ-करनाल राष्ट्रीय महामार्ग (NH-709A) वर असणाऱ्या भुनी टोलनाक्यावर 17 ऑगस्ट रोजी एक लाजिरवाणी घटना घडल्याचं समोर आलं आहे. टोल कर्मचाऱ्यांनी भारतीय लष्कर जवान कपिल सिंह आणि त्यांचा भाऊ शिवम यांना अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली.
ही घटना उजेडात आल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) कडक कारवाई करत टोल कलेक्शन एजन्सी, मेसर्स धरम सिंह अँड कंपनीवर 20 लाखांचा दंड ठोठावला आहे. तसंच कंपनीसोबतचा करार रद्द करत भविष्यात टोल प्लाझा लिलावात भाग घेण्यापासून रोखलं आहे.
भारतीय जवानाला टोल कर्मचाऱ्यांकडून मारहाण
मेरठमधील गोटका गावातील रहिवासी असलेले लष्करी जवान कपिल सिंग 17 ऑगस्टच्या रात्री त्याचा चुलत भाऊ शिवमसोबत दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने निघाले होते. त्यांना श्रीनगरमध्ये कर्तव्यावर रुजू व्हायचं होतं. भुनी टोल प्लाझावर लांब रांग आणि वेळेअभावी कपिल यांनी टोल कर्मचाऱ्यांना गाडी लवकर जाऊ देण्याची विनंती केली. पण यादरम्यान वाद झाला आणि तो इतका वाढला की टोल कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांनी कपिल यांना खांबाला बांधलं आणि काठ्यांनी मारहाण केली. एका कर्मचाऱ्याने डोक्यात दगड घालण्याचाही प्रयत्न केला.
यादरम्यान कपिलचा भाऊ शिवम याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यालाही मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट आहे. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांचा जमाव टोल प्लाझावर जमला आणि त्यांनी टोल कर्मचाऱ्यांचा निषेध करत तोडफोड केली. या गोंधळामुळे परिसरात तणाव वाढला. मेरठ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणी एफआयआर नोंदवला आणि काही आरोपींना अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
टोल कलेक्शन एजन्सीला 20 लाखांचा दंड
NHAI ने गांभीर्याने या घटनेची दखल घेत तात्काळ कारवाई केली आहे. तसंच टोल कलेक्शन एजन्सीला 20 लाखांचा दंड ठोठावला आहे. एनएचएआयने एका निवेदनात म्हटलं आहे की, कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यात आणि टोल प्लाझावर सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरली, जे कराराचं मोठं उल्लंघन आहे. ‘आम्ही अशा वर्तनाचा तीव्र निषेध करतो आणि राष्ट्रीय महामार्गांवर प्रवाशांचा सुरक्षित आणि अखंड प्रवास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत,’ असं त्यांनी निवेदनात सांगितलं आहे.
जवान कपिल सिंह आणि त्यांचा भाऊ शिवम यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र या घटनेमुळे सैनिकांबद्दलचा आदर आणि टोल प्लाझाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सोशल मीडियावर लोकांनी टोल कर्मचाऱ्यांच्या गुंडगिरी आणि स्थानिक पोलिसांच्या कथित निष्क्रियतेवर टीका केली आहे. अनेक नेटकऱ्यांनी या घटनेला राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलं आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भुनी टोल प्लाझा मेरठ-कर्नल राष्ट्रीय महामार्गावर (NH-709A) मेरठ जिल्ह्यातील भुनी गावाजवळ आहे.