
उपराष्ट्रपती निवडणुकीच्या हालचाली वाढल्या आहेत. प्रादेशिक आणि राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक खूपच रंजक बनली आहे. त्याचं कारण, असं उपराष्ट्रपती पदासाठी काँग्रेस आणि एनडीएनं दक्षिणेतील उमेदवार निवडलेले आहेत. एनडीएने राजकीय समीकरण साधत तामिळनाडूमधील नेते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवार घोषित केलं.
आता काँग्रेसनेही आंध्र प्रदेशातील सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना आपला उमेदवार असल्याची घोषणा केलीय. काँग्रेसच्या या चालीमुळे एनडीएचे घटक पक्ष असलेल्या टीडीपीसमोर पेच निर्माण झालाय. तर हा डाव टाकून काँग्रेसने भाजपला चेकमेट केलंय. इंडिया आघाडीनं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना आपले उमेदवार म्हणून घोषित केले आहे. हे आंध्र प्रदेशातील रंगारेड्डी जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
दुसरीकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच (एनडीए) महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिलीय. राधाकृष्णन हे तामिळनाडूच्या ओबीसी गोंडर समुदायातून येतात. दोन्ही उमेदवार दक्षिणेतून येत असल्याने उपराष्ट्रपती निवडणुकीत रंगत वाढलीय. या उमेदवारांमुळे एनडीए आणि अखिल भारतीय आघाडीतील मित्रपक्षांसाठी पेच निर्माण झालाय.
उपराष्ट्रपती निवडणुकीत भाजपला चीतपट करण्यासाठी काँग्रेसने मोठी चाल खेळत एनडीएच्या घटक पक्षाला धर्मसंकटात टाकलंय. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देऊन, इंडिया आघाडीनं आंध्र प्रदेशच्या राजकारणात एक नवीन समीकरण निर्माण केलंय. हा निर्णय आंध्र प्रदेशातील सत्ताधारी तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) आणि विरोधी वायएसआर काँग्रेस पक्ष (वायएसआरसीपी) दोघांसाठीही पेच निर्माण करणारा ठरलाय.
टीडीपी हा एनडीएचा एक महत्त्वाचा मित्रपक्ष आहे. त्याचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे धर्मसंकटात सापडले आहेत. प्रादेशिक अभिमान जपायचा का की युतीसोबत प्रामाणिक राहायचं या प्रश्नात ते अडकले आहेत. सुदर्शन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे असल्याने, टीडीपीवर त्यांच्या राज्य नेत्याला पाठिंबा देण्यासाठी दबाव वाढलाय.
दुसरीकडे वायएसआरसीपीचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केल्यानंतर एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांना पाठिंबा जाहीर केला आहे. परंतु सुदर्शन रेड्डी यांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतल्याने त्यांची परिस्थितीही गुंतागुंतीची झाली आहे. आंध्र प्रदेशात वायएसआरसीपीचा पाया प्रामुख्याने रेड्डी समुदाय आहे. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रादेशिक भावना जागृत झाल्या आहेत. आता जगन यांना एनडीएशी असलेली आपली बांधिलकी कायम ठेवायची की त्यांच्या राज्यातील उमेदवाराला पाठिंबा द्यायचा हे कळत नाहीये.