
CM फडणवीसांनी पर्याय शोधलाय…
भाजपमधील सध्याचे सर्वात चर्चित आणि वादग्रस्त आमदार कोण? अशी यादी काढायला घेतली तर त्यात पहिले नाव नक्कीच गोपीचंद पडळकर यांचे लिहावे लागेल. सतत वादग्रस्त विधाने, सतत आक्रमक कृती, कडवी हिंदुत्ववादी भूमिका यामुळे ते चर्चेत आहेत. मुस्लीम समाजाला दुखावणारी विधाने, ख्रिश्चन समाजावर जबरदस्ती धर्मांतरण करत असल्याचे आरोप यामुळे ते इतर धर्मींच्या टीकेचे धनी ठरतात. त्याचा फटका थेट भाजपला आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना बसताना दिसतो.
पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि पवित्र अशा विधानभवनात झालेल्या मारहाणीनंतर तर पडळकर यांची राज्यभरात अक्षरशः नाचक्की झाली. सभागृहासमोर त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. फडणवीस यांनीही “आमदार माजलेत असा संदेश राज्यात जातोय,” अशी उद्विग्नता व्यक्त केली होती. पडळकर यांचे हिंदू मोर्चेही अनेकदा वादग्रस्त ठरतात. त्यांच्या मोर्चांनंतर वातावरण ढवळून निघते, दंगली होतात, असे आरोप केले जातात.
मात्र पडळकर यांच्या मागे असलेला धनगर समाज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात बोलण्यासाठी असलेला आक्रमक चेहरा हे पडळकर यांचे उपद्रव मूल्य होते. त्यामुळे भाजपकडेही पडळकर यांच्यासाठी पर्याय नव्हता. मात्र फडणवीस यांना सांगली जिल्ह्यातूनच पडळकर यांच्यासाठी पर्याय शोधला आहे. ॲड. चिमणराव डांगे यांच्या रुपाने एक सुसंस्कृत धनगर युवा चेहरा भाजपला गवसला आहे.
नुकतंच माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांसह भाजपमध्ये प्रवेश केला. वयाच्या नव्वदीमधील नेत्याच्या पक्ष प्रवेशाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले. ही उपस्थिती बरेच काही सांगून जात होती. काँग्रेस व राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये नेते येत असताना आता पक्ष सोडून गेलेले मूळ भाजपवाले देखील पक्षात परतू लागले आहेत, असाच मेसेज देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. याचवेळी चिमणराव डांगे यांच्यासाठी अण्णा डांगे यांनी फडणवीस यांच्याकडे शब्द टाकल्याचे सांगितले जाते.
अण्णा डांगे यांना हे भाजपच्या माधव पॅटर्नमधील अत्यंत जुने नेते अशी ओळख. त्यामुळेच भाजपने इस्लामपूर भागात डांगे यांना बळ देताना शैक्षणिक संस्था, सूतगिरणी अशा सर्व गोष्टींचे पाठबळ दिले आहे. आजही या संस्थांमधील लाभार्थ्यांमुळे इतर समाजाचा जनाधार तर डांगे यांच्याकडे आहेच, पण धनगर समाजाचीही मतपेढी डांगे यांनी स्वतःकडे ठेवली आहे. यातूनच राष्ट्रवादीमध्ये असताना जयंत पाटील यांनीही इस्लामपूरच्या राजकारणात चिमणराव डांगेंना उपनगराध्यक्ष करून संधी दिली होती. गेली काही वर्षे जयंतरावांच्या राजकारणात डांगे त्यांच्यासमवेत राहिले आहेत.
फडणवीस यांनीही धनगर समाजाचा एक चेहरा म्हणून चिमणराव डांगे यांच्याकडे बघितल्याचे बोलले जाते. सध्या जिल्ह्यातील धनगर समाज काही प्रमाणात भाजपसमवेत आहेच. पण डांगे यांच्या प्रवेशामुळे हा समाज आता मोठ्या प्रमाणात भाजपसमवेतच गेल्याचेही संकेत जिल्ह्यात आणि राज्यात जातील ॲड. चिमण डांगे यांच्या रुपाने एक सुसंस्कृत धनगर युवा चेहरा भाजपला गवसला आहे. त्यांना भाजप कसे बळ देते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.