
सर्व्हेने राहुल गांधींसह नितीश कुमारांचे टेन्शन वाढवले…
बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीने कंबर कसली आहे. मतदार अधिकार यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वातावरण तापवले आहे.
तर अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. त्यातच एका सर्व्हेने या दोघांचीही धडधड वाढविली आहे.
बिहारमधील वर्षेअखेरीस नवे सरकार अस्तित्वात येणार आहे. एनडीए आणि इंडिया आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. एका ताज्या सर्व्हेनुसार राज्यात पुन्हा एकदा एनडीएचीच सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, सत्ता आली तरी नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला फटका बसण्याची शक्यता आहे.
एनडीमध्ये भाजपच्या जागांमध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत वाढ होताना दिसत आहे. एकूण 243 पैकी एनडीएला 136 जागा मिळतील, अंसा अंदाज वर्तविण्यात आला आहे. टाईम्स नाऊज-जेव्हीसीचा हा सर्व्हे आहे. सर्व्हेनुसार भाजपला 64 जागांवर विजय आणि 17 जागांवर आघाडीसह 81 जागा मिळण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. मागील निवडणुकीत त्यांना 43 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत त्यांच्या जागा 12 ने कमी होऊ शकतात. सर्व्हेनुसार एनडीएला 48.9 टक्के तर इंडिया आघाडीला 35.8 टक्के मतदान होऊ शकते. बहुमतासाठी 122 जागांची गरज असताना इंडिया आघाडी जेमतेम 75 पर्यंत जागा जिंकू शकते, असा अंदाज सर्व्हेमध्ये वर्तविण्यात आला आहे.
इंडिया आघाडीमध्ये राष्ट्रीय जनता दलाला 52 जागा मिळू शकतात. मागील निवडणुकीत 75 जागा मिळवत आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे या निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाला सर्वात मोठा फटका बसू शकतो. बिहारमध्ये सध्या मतदार अधिकार यात्रेच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करणारे राहुल गांधी यांच्या पक्षाचीही वाताहात होण्याची चिन्हे आहेत. सर्व्हेनुसार काँग्रेसला केवळ दहा जागा मिळतील, असां अंदाज आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसला 19 जागा मिळाल्या होत्या.
पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या प्रशांत किशोर यांच्या जन सुराज्य पक्षासह असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाला अनुक्रमे 2 व 3 जागा मिळतील, असा अंदाज आहे. बहुजन समाज पक्षाला केवळ एका जागेवर विजय मिळू शकतो. तर 26 जागांवर अटीतटीची लढत होईल, असा अंदाही सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
तेजस्वी यादव यांना पसंती
विशेष म्हणजे लोकांनी एनडीएला अधिक समर्थन दिले असले तरी मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती तेजस्वी यादव यांना मिळाली आहे. नितीश कुमार यांची लोकप्रियता घटल्याचे या सर्व्हेमध्ये दिसते. तेजस्वी यादव यांना 38.3 टक्के तर नितीश कुमार यांना 35.6 टक्के लोकांनी समर्थन दिले आहे. याचाच अर्थ जेडीयूची बिहारमधील एकूणच ताकद कमी झाल्याचे चित्र आहे.