
शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता देण्याबाबत समाजात संमिश्र भावना आहेत. मात्र, आता स्वायत्ततेशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. शैक्षणिक संस्थांच्या स्वायत्ततेचे स्वैराचारात रूपांतर होता कामा नये, याची खबरदारी घेत शैक्षणिक संस्था आणि उद्योगविश्वांत कुशल मनुष्यबळाचा सेतू निर्माण केला पाहिजे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित सीओईपी अभिमान पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
याप्रसंगी उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते, सीओईपी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनील भिरूड, कुलसचिव डॉ. दयाराम सोनवणे, सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेचे मानद सचिव डॉ. सुजितकुमार परदेशी आणि नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरमचे चेअरमन डॉ.अनिल सहस्रबुद्धे उपस्थित होते.सीओईपीने यंदा जीवनगौरव पुरस्काराने माजी शास्त्रज्ञ वसंथा रामास्वामी यांना सन्मानित केले.
सीओईपी अभिमान पुरस्कार विलास जावडेकर, डॉ. महांतश हिरेमठ, जयंत इनामदार, उमेश वाघ, तुषार मेहेंदळे आणि श्रावण हर्डीकर यांना दिला. विद्यापीठात नव्याने बांधलेले ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकीच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संशोधक वृत्ती जोपासण्यासाठी स्वातंत्र्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
स्वातंत्र्य असेल तरच संशोधक मोकळ्या आणि मुक्त मनाने संशोधन करू शकतात. ज्याकाळी इंटरनेट आणि संगणकीय क्रांती झाली त्यावेळी अनेक नोकऱ्यांवर गदा येईल, असा नकारात्मक सूर होता. मात्र, शैक्षणिक संस्थांनी त्या क्रांतीला सामोरे जाईल, असे कुशल मनुष्यबळ विकसीत करून सिलीकॉन व्हॅली काबीज केली. आता एआय आणि क्वाँटम कॉम्प्युटींगचे युग आहे. या कृत्रिम बुद्धीमत्तेलाही भारतीय विद्यार्थी आपल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेव्दारे, अर्थात एनएआयव्दारे सक्षमपणे सामोरे जातील.