चाकण (ता. खेड) प्रतिनिधी – विजयकुमार जेठे
पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाकण शहरातील उड्डाण पुलाच्या संरक्षक भिंतीवर झाडे-झुडपे वाढून ती अक्षरशः जंगलात रूपांतरित झाली असतानाही संबंधित प्रशासन डोळेझाक करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. महामार्गाची जबाबदारी असलेल्या यंत्रणा नेमक्या कुठे गायब आहेत, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
संरक्षक भिंतीवर मुळांसह वाढलेली झाडे ही थेट पुलाच्या मजबुतीस धोका निर्माण करणारी असताना, त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल वाहनचालक व स्थानिक नागरिक करत आहेत.
महामार्गावरील टोल वसुली बंद झाल्यापासून या मार्गाच्या दुरुस्ती व देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. टोलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची वसुली होत असताना गप्प बसणारे अधिकारी, वसुली थांबताच महामार्गाच्या सुरक्षिततेलाच तिलांजली देत असल्याचे स्पष्ट दिसून येते. हे निष्काळजीपणाचे नव्हे तर जबाबदारी झटकण्याचे उघड उदाहरण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दररोज हजारो अवजड वाहने, कामगार, विद्यार्थी आणि प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. मात्र पुलाच्या संरक्षक भिंतीवर वाढलेली झाडे, धुळीचे साम्राज्य, खराब रस्ते आणि कोणतीही देखभाल नसल्यामुळे हा महामार्ग अपघातांना निमंत्रण देत आहे. पावसाळ्यात भिंत खचण्याचा किंवा दगड रस्त्यावर कोसळण्याचा धोका अधिक वाढणार आहे, याची जाणीव प्रशासनाला नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.
फक्त कागदावर आदेश, बैठका आणि पाहणी करून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. एखादा बळी गेल्यानंतर चौकशी समित्या नेमण्याऐवजी, आत्ताच ठोस कारवाई करून झाडे हटवणे व संरक्षक भिंतीची मजबुती तपासणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अन्यथा, भविष्यात घडणाऱ्या दुर्घटनांची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणांवरच राहील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
