पारनेर तालुका प्रतिनिधी/विजय उंडे
कर्जुले हर्या ते वासुंदे या सुमारे ४ किलोमीटर लांबीच्या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन शिवसेना नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते पार पडले. या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून जवळपास ३.७५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.
भूमिपूजन प्रसंगी बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले की, आजपर्यंत तालुक्यातील अनेक वाडी व वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी निधी मंजूर करून देण्यात आला असून त्यामुळे तालुक्यातील दळणवळणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे. येणाऱ्या काळातही तालुक्यातील रस्ते विकास व जलसंधारणाची कामे प्राधान्याने करण्यासाठी आपण कायम तत्पर राहणार आहोत. विशेषतः दोन गावांना जोडणारे परंतु आजवर दुर्लक्षित राहिलेले रस्ते मंजूर करून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कर्जुले हर्या, वासुंदे तसेच परिसरातील अनेक गावांना तालुक्याच्या मुख्य ठिकाणांशी जोडणारा महत्त्वाचा दुवा असणाऱ्या या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच व्यापाऱ्यांची दळणवळणाची मोठी अडचण दूर होणार असून प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि जलद होणार आहे. विशेषतः शेतीमाल वाहतूक, दैनंदिन व्यवहार आणि आपत्कालीन सेवांसाठी हा रस्ता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या रस्त्याच्या कामामुळे कर्जुले हर्या, वासुंदे आणि आसपासच्या अनेक गावांतील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार असून गावोगावी पायाभूत सुविधांचा विकास झाला तरच ग्रामीण भाग खऱ्या अर्थाने सक्षम होईल, अशी भावना यावेळी सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला परिसरातील गावाचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा.चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थांचे संचालक, विविध संस्थांचे मान्यवर पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त करत सुजित झावरे पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
