दैनिक चालु वार्ता, इंदापूर प्रतिनिधी-बापू बोराटे
पुणे(इंदापूर):-महाराष्ट्र राज्यात १ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या “राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान” अंतर्गत विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथे दि. १९ जानेवारी २०२६ रोजी रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावर्षीची संकल्पना “सडक सुरक्षा – जीवन रक्षा (रस्ता सुरक्षा – जीव वाचवणे)” अशी असून, रस्ते अपघात व जीवितहानी कमी रण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन व जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आरटीओ निरीक्षक श्री. सुरज पाटील होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की,“रस्ता सुरक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादेचे पालन, दारू पिऊन वाहन न चालवणे तसेच वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी केल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होऊ शकते. आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक असल्याने त्यांनी स्वतः सुरक्षित राहून समाजालाही सुरक्षिततेचा संदेश द्यावा.” आरटीओ व पोलीस प्रशासन रस्ता सुरक्षेसाठी ‘अॅक्शन मोड’मध्ये कार्यरत असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, “रस्ता सुरक्षा ही थेट मानवी जीवनाशी निगडित बाब आहे. तरुण पिढीने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अनेक मौल्यवान जीव वाचू शकतात. अशा जनजागृतीपर कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते. सुरक्षित प्रवास हीच खरी शाश्वत प्रगती आहे.” महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
हा कार्यक्रम विद्यार्थी मार्गदर्शन प्रणाली अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशिक्षण व नियुक्ती विभागाचे अधिकारी प्रा. योगेश जाधव यांनी केले. विद्यार्थी मार्गदर्शन प्रणालीचे अध्यक्ष प्रा. राजीव वाघमारे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन केले. सदर उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. या जनजागृती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक आणि जबाबदार दृष्टिकोन निर्माण झाल्याचे दिसून आले.
