वैजापूर प्रतिनिधी – अरविंद पवार
सहानगाव येथील मारुती मंदिर परिसरासमोरील प्रशस्त आवारात सालाबादप्रमाणे याही वर्षी दि. 23 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य व भक्तिमय आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची माहिती ह.भ.प. नवनाथ महाराज जाधव यांनी दिली.
या अखंड हरिनाम सप्ताहास शुक्रवार दि. 23 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता गावातून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेने प्रारंभ होणार असून, टाळ-मृदंगाच्या गजरात व नामघोषात संपूर्ण सहानगाव भक्तीरसात न्हाऊन निघणार आहे. दि. 30 जानेवारी रोजी काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
सप्ताहाच्या संपूर्ण कालावधीत काकडा भजन, पसायदान, गाथाभजन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर आदी विविध पवित्र आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आठही दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड नामस्मरण सुरू राहणार असून भाविकांसाठी ही मोठी आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे.
सप्ताह काळात दररोज दुपारी 3 ते 6 या वेळेत सकल संत चरित्र कथा प्रवक्ते ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज फापाळे हे रसाळ व अभ्यासपूर्ण कथा कथन करणार असून, त्यांच्या प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
कीर्तनकारांचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
शुक्रवार दि. 23/01/2026 – ह.भ.प. संजय महाराज शास्त्री, लाखणीकर
शनिवार दि. 24/01/2026 – कु. ह.भ.प. भागवताचार्य तृप्तीताई वाघ, बिरोळा
रविवार दि. 25/01/2026 – ह.भ.प. सचिन महाराज काळे, हिंगणेकर
सोमवार दि. 26/01/2026 – ह.भ.प. कृष्णा महाराज शास्त्री, दरेगांवकर
मंगळवार दि. 27/01/2026 – ह.भ.प. गोविंद महाराज कदम, उंदीरवाडीकर
बुधवार दि. 28/01/2026 – ह.भ.प. गणेश महाराज मगर, वाकलेकर
गुरुवार दि. 29/01/2026 – ह.भ.प. शुभम महाराज कोटमे, देवळणेकर
शुक्रवार दि. 30/01/2026 रोजी
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज फापाळे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे भव्य वाटप करण्यात येणार आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त सहानगाव व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नामस्मरण, कीर्तन व प्रवचनांचा आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन गावकरी मंडळी व सप्ताह आयोजन समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
