इंदोरी बद्रीनारायण घुगे
श्री भैरवनाथाच्या चरणी नारळ फोडून नवलाख उंब्रेत मेघाताई प्रशांत भागवत यांच्या प्रचाराचा शुभारंभ
ढोल-ताशांच्या दणदणीत गजरात जय श्री भैरवनाथच्या जयघोषात आणि उत्साहाच्या जल्लोषात नवलाख उंब्रे येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या भक्तिभावात पार पडला. इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. मेघाताई प्रशांत भागवत तसेच वराळे पंचायत समिती गणाचे उमेदवार रवी निवृत्तीभाऊ शेटे यांच्या प्रचाराची ही दमदार आणि लक्षवेधी सुरुवात ठरली. श्री भैरवनाथ महाराजांच्या चरणी विधिवत नारळ फोडून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला.
या प्रसंगी माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, निवृत्तीभाऊ शेटे, प्रशांत भागवत, रविंद्र भेगडे, शांताराम कदम, भाऊसाहेब म्हाळसकर, प्रशांत शिंदे, नितीन मराठे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण असून, पारंपरिक वाद्यांच्या गजरात संपूर्ण गाव भारावून गेले होते.
प्रचाराच्या प्रारंभी श्री भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन उमेदवारांनी विकासाचा संकल्प केला. यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी नवलाख उंब्रे आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाची भूमिका नेहमीच स्पष्ट आणि लोकाभिमुख राहिली आहे. सौ. मेघाताई भागवत आणि रवी शेटे हे विकासाची मशाल हातात घेऊन मैदानात उतरले असून, जनतेचा त्यांना भरघोस पाठिंबा मिळेल. असा विश्वास व्यक्त केला.
सौ. मेघाताई भागवत या नवलाख उंब्रे गावात सामाजिक बांधिलकीची ओळख म्हणून परिचित आहेत. महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते व ग्रामस्वच्छता अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. याच कार्याची आठवण यावेळी अनेक नागरिकांनी करून दिली. मेघाताई म्हणजे काम करणारी नेतृत्त्वशक्ती आहे. अशी भावना ग्रामस्थांतून व्यक्त होताना दिसली.
रवी निवृत्तीभाऊ शेटे यांनीही आपल्या भाषणात युवक, शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. पंचायत समिती स्तरावर पारदर्शक कारभार, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या अडचणी, रोजगारनिर्मिती आणि मूलभूत सुविधांसाठी आपण कटिबद्ध आहोत. असे ते म्हणाले.
कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड उत्साह दिसून आला. भगवे झेंडे, घोषणाबाजी आणि संघटित प्रचाराची झलक या शुभारंभात पाहायला मिळाली. भाजपाचा हा प्रचार प्रारंभ म्हणजे केवळ निवडणुकीची सुरुवात नसून, विकासाची नवी दिशा ठरवणारा निर्णायक टप्पा असल्याची भावना उपस्थितांमध्ये होती.
नवलाख उंब्रे परिसरात या प्रचार शुभारंभाने राजकीय वातावरण तापले असून, येणाऱ्या काळात प्रचार आणखी वेग घेणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


