दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २५ जानेवारी २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जागृती शपथविधी कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकशाही बळकट करण्याचा आणि मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प केला.
या वेळी अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, तहसीलदार संतोष बनकर, नायब तहसीलदार पंकज मंदाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शपथविधीदरम्यान वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदार म्हणून नोंदणी करणे व प्रत्येक निवडणुकीत मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे, असा ठाम संदेश देण्यात आला.
यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारत निवडणूक आयोगाने ‘माझा भारत, माझे मत’ ही मुख्य थीम तर ‘भारतीय लोकशाहीच्या केंद्रस्थानी नागरिक’ ही टॅगलाइन घोषित केली आहे. या अनुषंगाने २५ जानेवारी रोजी जिल्हाभरात मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून नवमतदार नोंदणी, मतदानाचे महत्त्व आणि लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आवाहन केले की, लातूर जिल्ह्यातील सर्व विभागीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी राष्ट्रीय मतदार दिन हा लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करावा आणि प्रत्येक पात्र मतदाराने आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा. लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी सजग व सक्रिय नागरिकत्व अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
