देगलूर, प्रतिनिधी – संतोष मनधरणे
देगलूर शहरातील मध्यभागी लोहिया मैदान परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका येथे विद्यार्थ्यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करावा लागत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अभ्यासिकेत टेबल, खुर्च्या, फॅन तसेच बसण्यायोग्य आवश्यक साहित्यच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अभ्यासासाठी प्रसन्न वातावरण असणे अपेक्षित असताना येथे मात्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असून दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांचा जीव कासावीस होत आहे.
अभ्यासिकेचे छत गळत असून फर्निचर मोडक्या अवस्थेत जिकडे-तिकडे पडले आहे. बाथरूमची सुविधा असली तरी त्याठिकाणी पाणीच नसल्याने विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छतेसाठी सफाई कर्मचारी नसल्यामुळे विद्यार्थीच स्वतः साफसफाई करून अभ्यासासाठी बसत असल्याची विदारक परिस्थिती आहे.
यासंदर्भात ग्रंथपालांना विचारले असता, अभ्यासिकेच्या टेरेसवर गवत वाढले असून मोडक्या वस्तू पडल्या आहेत. छतावर सुमारे एक फूट खोल खड्डे पडलेले असून कधीही छत कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली. अशा धोकादायक अवस्थेत अभ्यास करणे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.या समस्यांकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. अन्यथा येत्या काळात आंदोलन किंवा रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.
नवनिर्वाचित नगरसेवक बबलू टेकाळे यांनी अभ्यासिकेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मीनल कांबळे व नगराध्यक्ष विजयमालाताई टेकाळे यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर अभ्यासिकेची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे.
