दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रताप नागरे
वाशिम,
दि. २६ जानेवारी :
येथील नगर परिषद कार्यालयात ७७ व्या गणतंत्र दिनानिमित्त नगराध्यक्ष अनिल माधवराव केंदळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी केवळ राष्ट्रीय ध्वजाला सलामी न देता, संविधानात निहित लोकशाही मूल्ये, जबाबदारी, प्रामाणिकपणा व सेवाभाव यांची पुनःप्रतिज्ञा करण्यात आली.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष केंदळे म्हणाले की, संविधानाने दिलेले अधिकार केवळ कागदापुरते मर्यादित न राहता सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणे हीच खरी लोकप्रतिनिधीची भूमिका आहे. नागरिककेंद्री प्रशासन, पारदर्शक कारभार व विकासाभिमुख निर्णय प्रक्रियेद्वारे वाशिम शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषद कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गणतंत्र दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून, लोकशाहीतील उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारा दिवस आहे. या दिवशी वाशिमच्या विकासासाठी अधिक प्रभावी, लोकाभिमुख व जबाबदार प्रशासन राबविण्याचा निर्धार करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
ध्वजारोहण कार्यक्रमास नगर परिषद अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
