दैनिक चालु वार्ता म्हसळा (रायगड ) अंगद कांबळे
म्हसळा – रायगड जिल्ह्यासह म्हसळा तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या रंन धुमाळीचा फड रंगला असून प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे.तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ,शिवसेना (शिंदे गट),शिवसेना (उबाठा)+ शेतकरी कामगार पक्ष युती असे मातब्बर पक्ष रिंगणात असून निवडणूक चुरशीची होणार असे दिसत आहे.म्हसळा तालुक्यात ४९ पांगळोली,४९ पाभरे असे दोन जिल्हा परिषद गट असून खरसई,पाभरे,सालविंडे,पांगळोली असे चार पंचायत समिती गण आहेत.५०पांगळोली गटात १०८९१ पुरुष तर ११८१० स्त्री मतदार असे एकूण २२७००१मतदार आहेत.तर पाभरे गटात ९९३६ पुरुष आणि १०८९४ स्त्री असे एकूण २०८३० मतदार आहेत.त्यामुळे मतदारांची संख्या पाहता महिला मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरवणार असल्याचे दिसून येते. तालुक्यात सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मोठा पक्ष मानला जात आहे.या पक्षाकडे गेली २ वेळा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये सत्ता होती तसेच मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार मा.अदिती तटकरे यांना तालुक्यातून भरघोस मतांची आघाडी मिळाली होती.विकासकामांच्या जोरावर गेली २००९ पासून या मतदार संघासह तालुक्यात खासदार सुनिल तटकरे यांचा वरचष्मा राहिला आहे.मात्र यावेळी राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी त्यांना कडवे आव्हान देत शिवसेना पक्षाकडून उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.तर शिवसेना (उबाठा)पक्षाने आपल्या जुन्या मित्राला शेतकरी कामगार पक्षाला साद घातली असून या दोन्ही पक्षाने युती करून आपले उमेदवार रिंगणात उभे केले असल्याने तालुक्यात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. सध्या सगळेच पक्षाचे उमेदवार प्रचारामध्ये व्यस्त आहेत गाव बैठकांना जोर धरायला सुरुवात झाली आहे.सध्या तरी तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचे चित्र आहे.मात्र मतदार कुणाच्या बाजूने मतदान देऊन कौल देतेली हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.
