अमरावती (प्रतिनिधी)- संजय सरवटकर
अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई शाळेत मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत दिलेली खिचडी खाल्ल्यानंतर १२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या व पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शाळेसाठी पुरविण्यात येणारी खिचडी ही बाहेरील कंत्राटी रसोईघरातून येत असून, सदर रसोईघरामध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विशेष म्हणजे, ही रसोईघर मजुरांच्या भरवशावर चालवली जात असल्याचेही समोर आले आहे.
घटनेबाबत पालकांनी मुख्याध्यापक व संबंधित शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली असून, कंत्राटदार आणि पोषण आहार अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. मध्यान्ह भोजन योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांचे पोषण व आरोग्य सुधारणे हा असताना, त्याच योजनेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
दरम्यान, गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशीचे आदेश देत दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र, पोषण आहार अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृत तक्रार मिळाली नसल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
या घटनेमुळे मध्यान्ह भोजन योजनेतील गुणवत्ता, स्वच्छता आणि नियंत्रण यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी पालक व नागरिकांकडून केली जात आहे.
🟥
“शाळेतील मध्यान्ह भोजनामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असून, दोषी कंत्राटदार, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कुठलीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.”
सुधीर खोडे,
– गटशिक्षणाधिकारी प.स. अंजनगाव सुर्जी
🟥 🟥 शाळा मुख्याध्यापक
“मध्यान्ह भोजन योजना ही शासनाच्या नियमांनुसार कंत्राटदारामार्फत राबवली जाते. घडलेल्या घटनेची माहिती वरिष्ठांना देण्यात आली असून, चौकशीत पूर्ण सहकार्य केले जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.”
–
–
🔴 या प्रकरणासंदर्भात मला अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही, असे स्पष्ट स्पष्टीकरण पोषण आहार अधीक्षक शीला आठवले यांनी माहिती दिली.
– शिला आठवले,पोषण आहार अधिक्षक,पं.स.अंजनगाव सुर्जी

