खेड तालुका प्रतिनिधी- विजयकुमार जेठे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि जनसामान्यांत अगदी घरातील एक सदस्याप्रमाणे दादा नावाने संबोधले जाणारे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी पसरताच राजगुरुनगर शहरात शोककळा पसरली. अजितदादांचे खेड तालुक्यावर विशेष प्रेम होते, खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील या़ंच्या कार्यकाळात अनेक विकासकामांना भरभरून निधी उपलब्ध करून दिलेला होता .त्यामुळे राजगुरुनगर शहर आणि खेड तालुक्यात अजितदादांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर शोककळा पसरली आणि या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर आज राजगुरुनगर शहरात स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला.
शहरातील सर्व दुकाने, व्यावसायिक आस्थापना, बाजारपेठा, शाळा–महाविद्यालये तसेच खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. चौकाचौकात नागरिकांनी एकत्र येऊन शोक व्यक्त केला. अनेक ठिकाणी अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व व्यापारी संघटनांकडून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाहतूक तुरळक प्रमाणात सुरू होती, तर काही भागांत पूर्णपणे शांतता पाळण्यात आली. पोलिस प्रशासनाकडून शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून राजगुरुनगर शहरानेही या दुःखद घटनेत सामूहिक सहभाग नोंदवला आहे.
