ठाणे – प्रतिनिधी – नागेश पवार
ठाणे महापालिकेच्या सेवेतील कर्मचारी अधिकारी हे सुध्दा चांगले लेखक, गायक, कवी आहेत. तसेच ठाणे महापालिका ही नेहमीच कलेचा आदर करीत आली आहे. कलावंत आणि कला जपणारी महापालिका असा ठाणे महापालिकेचा नावलौकिक आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी यांनी येथे केले.
ठाणे महापालिकेतर्फे मराठी भाषा पंधरवड्या निमित्ताने विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच श्रुखंलेतील कवी संमेलन दिनांक २७ जानेवारी रोजी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडले. या कार्यक्रमास उपायुक्त उमेश बिरारी, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी यांनी उपस्थित कवींचे स्वागत केले.
पत्रकार आणि कवी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळून “न्यूजलेस कविता” असा लोकप्रिय कार्यक्रम करणाऱ्या चमूला या निमित्ताने काव्य संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. गझलकार सुनील तांबे, वृत्त निवेदिका आणि कवयित्री यामिनी दळवी, पत्रकार कवी सुरेश ठमके, पंकज दळवी आणि प्रशांत डिंगणकर यांनी कवी संमेलनात एकापेक्षा एक भावविभोर कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
कधी प्रेम, कधी उपहासात्मक वर्तमानावर बोट ठेवत, कधी व्यथा.वेदना, जीवन संघर्ष, जीवनातील शाश्वत सत्य तर कधी नर्म विनोद अशा मानवी भावभावनांचा अविष्कार असणाऱ्या कविता या निमित्ताने या कवींनी सादर केल्या.
गझल, हायकू, मुक्त छंद, वृत्तबध्द आणि चार ओळी असे कवितेचे विविध प्रकार हाताळणाऱ्या या कवीनी कवितेचा समृद्ध इतिहास ही या निमित्ताने उलघडून दाखवला. गिरणगावातील कामगारांचा आवाज असलेल्या नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने त्यांचे स्मरण करून आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन हे कवी संमेलन संपन्न झाले. प्रशांत डिंगणकर यांनी सादर केलेली “बा विठ्ठला” उपहासात्मक कविता, यामिनी दळवी यांनी सादर केलेली “सुखाला आज माहेरी पुन्हा परतायला सांगू…” ही गझल… तर “हार नाही जीत नाही” “श्वास गझल..” या सुनील तांबे यांच्या तरनुम्म मधील गझल उपस्थितांची दाद मिळवून गेल्या. पंकज दळवी यांच्या नर्म विनोदी कवितांमुळे सभागृह हशा आणि टाळ्यात भरुन गेले.

