बॅलिस्टिक मिसाइलने सज्ज भारताची तिसरी आण्विक पाणबुडी नौदलात दाखल !
जागतिक स्तरावर परिस्थिती दिवसेंदिवस तणावपूर्ण होत असताना भारतानं आपल्या लष्करी सामर्थ्यामध्ये भरभक्कम वाढ केली आहे. शुक्रवारी बॅलिस्टिक मिसाईलने सज्ज ‘आयएनएस अरिदमन’ ही तिसरी आण्विक पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे.
INS अरिदमनमुळे भारताची सागरी आण्विक ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याचसोबत भारतीय नौदलाच्या विशाखापट्टणम येथे झालेल्या कार्यक्रमात अत्याधुनिक बनावटीच्या INS तारागिरीचंदेखील जलावतरण पार पडलं. यावेळी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची सूचक पोस्ट!
दरम्यान, आज आयएनएस अरिदमन व आयएनएस तारागिरी यांच्या जलावतरणाच्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोजक्या शब्दांमध्ये शेअर केलेल्या पोस्टमध्ये सूचक इशारा देण्यात आला आहे. ‘फक्त बोलत नाही, करून दाखवतो’, अशा आशयाची पोस्ट राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी सकाळी शेअर केली होती.
राजनाथ सिंह यांनी विशाखापट्टणम येथे झालेल्या कार्यक्रमात केलेल्या भाषणादरम्यान आयएनएस अरिदमन भारताच्या नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यामुळे वाढलेल्या सामर्थ्याचा मोठ्या गौरवपूर्ण शब्दांमध्ये उल्लेख केला. तसेच, भारताच्या सागरी सीमा आता अधिक सुरक्षित झाल्याचाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आता भारताच्या ताफ्यात तीन बॅलिस्टिक मिसाईल पाणबुड्या!
आयएनएस अरिदमनच्या समावेशामुळे आता भारताच्या सागरी सीमांना तिहेरी संरक्षण लाभलं आहे. याआधी भारताच्या ताफ्यात असणाऱ्या आयएनएस अरिहंत व आयएनएस अरिघात या लांब पल्ल्याच्या अण्वस्त्रवाहू पाणबुड्यांच्याच बाजूला आता शत्रूला धडकी भरवणारं सामर्थ्य घेऊन आयएनएस अरिदमन उभी राहिली आहे. त्यामुळे भारताच्या सागरी सीमांची सुरक्षा अधिक बळकट झाली आहे.
फक्त तीन नाही, चौथीही पाणबुडी येतेय!
भारताच्या Advanced Technology Vessel (ATV) प्रकल्पाचा भाग म्हणून या पाणबुड्या भारतीय नौदलात टप्प्याटप्प्याने दाखल होत आहेत. या प्रकल्पाची एकूण किंमत तब्बल ९० हजार कोटी इतकी आहे. याच प्रकल्पातील पुढचा टप्पा म्हणजेच चौथी बॅलिस्टिक मिसाईलने सज्ज आण्विक पाणबुडी लवकरच भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. या पाणबुडीसह आयएनएस अरिदमनच्या मोठ्या आकारामुळे या दोन्ही पाणबुड्या K-4 श्रेणीतील क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकतात. त्यामुळे भारताची शत्रूवर मारा करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
