प्रतिनिधी / स्वाती हडकर
चिपळूण : तालुक्यातील रामपूर शिवारातील दरीत झाडाझुडपांमध्ये संशयास्पदरीत्या जळालेल्या मानवी अवशेषांचा शोध लागल्यानंतर अवघ्या २४ तासांत खून व पुरावा नष्ट करण्याचा गंभीर गुन्हा उघडकीस आणत चिपळूण पोलीस ठाणे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारास रामपूर येथील डॉ. रावराणे यांनी त्यांच्या आंब्याच्या बागेजवळील दरीत काहीतरी जाळल्याचे व त्या ठिकाणी लहान आकाराची हाडे पडलेली असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता जळालेल्या अवशेषांसह हाडांचे तुकडे, अंगठी, रिंग आदी साहित्य आढळून आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिक स्टाफ व मोबाईल फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. कामथे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हाडे मानवी असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत दिल्यानंतर पोलिसांनी खून व पुरावा नष्ट करण्याच्या अनुषंगाने तपास सुरू केला.
या प्रकरणी गुन्हा रजि. नं. ८८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०३(१), २३८(ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान घटनास्थळाची जागा विशाल विजय खोडदेकर (वय २८, रा. रामपूर) याच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. तो फरार असल्याचेही समोर आले.
दि. ३१ मार्च रोजी रात्री १०.५० वा. पोलिसांनी विशाल खोडदेकर याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यात त्याची मैत्रीण जन्नतुनिसा जिन्नत खान (रा. मालाड, मुंबई) हिचा सहभाग उघड झाल्याने तिलाही दि. १ एप्रिल रोजी अटक करण्यात आली.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता दि. ६ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून गुन्ह्यामागील हेतू व इतर बाबींचा सखोल छडा लावला जात आहे.
संशयास्पद जळालेल्या अवशेषांपासून सुरू झालेला तपास जलद व शास्त्रीय पद्धतीने पूर्ण करत अल्पावधीत आरोपींपर्यंत पोहोचण्याची कामगिरी चिपळूण पोलिसांनी करून दाखवली आहे. त्यांच्या दक्षता व तपासकौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
