दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:मुखेड तालुक्यातील मुक्रमाबादसह या सर्वच आठही मंडळात विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम मंजूर झाल्याचे जिल्हाधिकारी यांनी परिपत्रक काढून जाहीर केले. तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. याची दखल घेत शेतकऱ्यांना अग्रीम विमा मंजूर करण्यात आली. पण उर्वरित ७५ टक्केच्या प्रतिक्षेत शेतकरी असून सदर रक्कम तात्काळ मंजुर करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केली आहे. पावसाच्या खंडामुळे व अतिपावसामुळे पिकांचे ६५ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे पाहणीत आढळून आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीला २५ टक्के पिक विम्याची अग्रणी रक्कम मंजूर करून वाटप करण्याचे आदेश दिले. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबादसह आठ मंडळाचा अग्रीम २५ टक्के विमा मंजूर झाला. पण शिल्लक असलेला ७५ टक्के पीकविमा देखील उत्पादकतेनुसार मंजूर झाला पाहिजे तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत विम्याचा लढा सुरु राहील, असे शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी सांगितले.
