दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी
गंगाराम दत्ता बंगरवार जिवंत असताना मृत झाल्याची कोर्टात खोटी माहिती देऊन कोर्टाच्या आदेशानुसार जमिनीचा सातबारा स्वतःच्या नावे करून विक्री करणाऱ्या कमलबाई बंगरवार तसेच जिवंत असताना कोणतीही शहानिशा न करता जमिनीचा फेरफार करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करून जमीन परत मिळावी.यासाठी गंगाराम बंगरवार यांनी दि.२ एप्रिल पासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक आमरण उपोषण सुरू केले आहे.
देगलूर शहरातील देशपांडे गल्लीत राहणाऱ्या गंगाराम दत्ता बंगरवार(वय ६९ वर्ष) यांना गंगाधर बंगरवार, लक्ष्मण बंगरवार, हुल्लाजी बंगरवार असे तीन भाऊ होते. त्यांना वडिलोपार्जित १ हेक्टर ४२ आर जमीन होती. या चारही भावांनी १४ ऑगस्ट २००१ रोजी शेतीची वाटणी करून घेतली.त्यानुसार प्रत्येकाच्या हिश्याला ३५.५० आर जमीन आली. शेतीची वाटणी होताच हुल्लाजी बंगरवार यांनी त्यांच्या हिश्याची जमीन (खरेदी खत दस्त क्रमांक १७९७/ २००१) विमलबाई चंद्रकांत पाटील रा. देगलूर यांना विक्री केली. दरम्यान गंगाराम दत्ता बंगरवार यांची त्यांच्या हिश्यातील ३५.५० आर जमीन गट क्रमांक ९८९/१ मध्ये होती. गंगाराम बंगरवार यांना एक मुलगा व एक मुलगी असून ते गेल्या बारा वर्षापासून पुण्यातील खराडी भागात सर्व कुटुंबासह राहून मोलमजुरी उदरनिर्वाह करतात. गंगाराम बंगरवार गावात राहात नसल्याची संधी साधून त्यांची भाऊजयी कमलबाई बंगरवार हिने गंगाराम आणि गंगाधर बंगरवार हे मयत झाले आहेत.असे देगलूरातील दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर येथे मा.न्यायमूर्तींना खोटे सांगून न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन खोटा फेरफार स्वतःच्या नावे लावून घेतला. एवढ्यावरच न थांबता कमलबाई बंगरवार त्यांचा मुलगा नागेश बंगरवार, मुलगी ज्योती चंद्रकांत येमावाड, रेखा बालाजी आऊलवार या चौघांनी संगणमत करून दि.१४ जून २०२४ रोजी (जमीन खरेदी खत क्रमांक १४९३ नुसार) सदर जमीन सुलोचना भगवान धबडगे व मुजीब उन्नीसा मोहम्मद अल्ताफ यांना परस्पर विक्री केली. पुण्यात राहणाऱ्या गंगाराम बंगरवार यांना त्यांची शेतजमीन परस्पर विक्री केल्याचे सहा महिन्यापूर्वी समजले. हे सर्व कुटुंब देगलूर येथे आले. त्यांनी सर्व प्रकारची कागदपत्रे गोळा केली व कमलबाई बंगरवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी व त्यांच्या मुलांने, ‘तुमचे येथे कांहीच नाही, तुम्हाला काय करायचे ते करा ? कुठे जायचे ते जा! असे म्हणून धमकावून पिटाळून लावले. स्वतःच्या मालकीची ३५.५० आर जमीन गेल्यामुळे बंगरवार यांनी १८ व २७ मार्च २०२५ रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर येथे अर्ज करून न्यायालयात खोटी माहिती सादर करून न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या कमलबाई व त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध तसेच कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता फेरफार करून सातबाराला नोंद करणाऱ्या तलाठ्याविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांची जमीन परत मिळवून देण्यासाठी दि.२ एप्रिल २०२५ पासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
