लोकसभा निवडणुका होऊन पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार आहे. तर दुसरीकडे बिहारमधील विधानसभा निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीपुर्वी मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता आहे.
त्यासोबतच काही फेरबदल केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचे या विस्ताराकडे लक्ष लागले असतानाच महाराष्ट्रातून या विस्तारात कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोंहचली आहे.
बिहारमध्ये या वर्षअखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. या ठिकाणच्या आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षालाही केंद्रात मंत्रिपद दिले जाऊ शकते. त्यासोबतच तामिळनाडूतील भाजपचे माजी अध्यक्ष आणि माजी आयपीएस अधिकारी के. अण्णामलाई यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
वर्षभरापुर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यातील महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळाली नव्हती. त्यांना मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद दिले जात होते. मात्र, राष्ट्रवादीला कॅबिनेटचे मंत्रीपद हवे होते. त्यामुळे नंतरच्या विस्तारात संधी दिली जाईल, असे सांगण्यात आले होते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदाराची संख्या त्यावेळी कमी होती.
वर्षभराच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाच्या खासदाराची संख्या वाढली आहे. राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या विजयी झाल्या आहेत. तर दुसरीकडे उदयनराजे भोसलेलोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे नितिन पाटील यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदाराचे लोकसभा व राज्यसभा मिळून संख्याबळ चार झाले आहे.
त्यामुळे येत्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीकडून माजी मंत्री प्रफ्फुल पटेल यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे विस्तारात त्यांना संधी मिळू शकते. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार आहेत. त्यामुळे गेल्यावर्षीच त्यांनी दोन मंत्रिपदाची मागणी केली होती. त्यांना त्यावेळी एक मंत्रिपद देण्यात आले होते. त्यावेळी बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव यांची वर्णी लागली होती.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावेळीच्या वाटाघाटीत केंद्रात आणखी एका मंत्रिपद शिवसेना शिंदे गटाला मिळू शकते, अशी चर्चा होती. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जर मंत्रिपद आले तर त्यासाठी त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यापैकी तीन टर्म मावळचे खासदार असलेले श्रीरंग बारणे व कल्याण डोंबवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पैकी कोणाला संधी दिली जाणार याची उत्सुकता आहे.
या विस्तारात ऐनवेळी भाजपकडून महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे. भाजपमध्ये नाराज असलेल्या एका नेत्याला संधी मिळू शकते अशी चर्चा आहे. महाराष्ट्रातील शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केंद्रीय मंत्रिपदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. सध्या महाराष्ट्रातून भाजपचे नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ आणि शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे मंत्री आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड एप्रिलअखेरीस
भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांच्या जागी एप्रिलअखेरीस नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यता आहे. देशभरातील भाजपच्या संघटनात्मक निवडणुका होत असून जवळपास 15 राज्यातील प्रदेश अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
