माजी आमदार संग्राम थोपटे यांना विधानसभेचे अध्यक्ष केले जाणार होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी कटकारस्थान केले. तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या माध्यमातून निवडणुका होऊ दिल्या नाहीत.
संग्राम थोपटे यांना अत्यंत मानाचे स्थान असणार्या विधानसभेच्या अध्यक्षपदापर्यंत फडणवीस यांनी पोहचू दिले नसल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी (दि. 19) केला. गणेश कला क्रीडा रंगमंचमध्ये आयोजित युवा ‘अल्पसंख्याक संसद’ या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले, थोपटेंना या पदापासून वंचित ठेवण्याचे काम फडणवीस यांनी केले. थोपटे अध्यक्ष झाले असते, तर चांगल्या माणसाला सभागृहाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली असती. शिवसेना पक्ष फोडताना कायद्याची ऐशीतैशी करण्यात आली. थोपटे अध्यक्ष असते, तर त्यांनी हे होऊ दिले नसते. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा फुटू दिला नसता, असा विश्वास सपकाळ यांनी बोलून दाखविला.
थोपटे कुटुंबीय हे काँग्रेसमधील मोठे नेतृत्व आहे. हे घराणे स्वाभिमान आणि संघर्षाचे प्रतीक असून, संपूर्ण आयुष्य काँग्रेससोबत राहिले आहे. संघर्षशील कुटुंब असून, त्यांच्याकडून संघर्षाची अपेक्षा आहे. ते दुसर्या पक्षात गेल्यावर त्यांचा भ्रमनिरास झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी काँग्रेसमध्ये राहावे. पक्ष सोडण्याचा आत्मघातकी निर्णय त्यांनी घेऊ नये, असे मित्रत्वाच्या नात्याने सांगत असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.
